दलितांच्या प्रश्नांविरुद्ध आवाज उठवण्याचे भासवून दलित तरुणांना माओवादी आंदोलनात ओढण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न असल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
विधान परिषदेत जयंतराव जाधव, किरण पावसकर, हेमंत टकले, अमरसिंह पंडित, दीपकराव साळुंखे-पाटील, सतीश चव्हाण, संदीप बजोरिया, अनिल भोसले व नरेंद्र पाटील यांनी माओवाद्यांच्या हालचालीबाबत प्रश्न विचारला होता. माओवाद्यांचे पश्चिम घाट लक्ष्य असून त्यांना पुण्यातून पाठिंबा मिळत आहे का, त्याबाबत शासनाने चौकशी केली आहे का, त्यात काय आढळून आले व शासनाने त्यावर काय कार्यवाही केली किंवा केली जात आहे, अशी या सदस्यांनी विचारणा केली होती.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी, या सदस्यांच्या प्रश्नांवरील लेखी उत्तरात माओवाद्यांच्या हालचालीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. राज्याच्या पश्चिम घाट परिसरात मुंबई, नाशिक, पुणे, इत्यादी शहरांचा समावेश आहे. या शहरी भागात व औद्योगिक वसाहतीत माओवादी विचारसरणीचा छुपा प्रचार केला जात आहे. दलितांच्या प्रश्नांविरुद्ध आवाज उठवण्याचे भासवून दलित तरुणांना माओवादी आंदोलनात ओढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.