दारूच्या नशेत शिवीगाळ करणाऱ्या मित्राचा ‘त्या’ तिघांनी रागाच्या भरात खून केला. हे खूनप्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून त्यांनी आणखी एकाच्या मदतीने मृतदेह खाडीच्या चिखलात पुरला. दोन दिवसानंतर मृत पावलेल्या तरुणाची चप्पल त्याच्या आईला खाडीकिनारी परिसरात सापडली आणि ‘त्या’ चौघांचे बिंग फुटले…

कोपरी येथील राजनगर झोपडपट्टी परिसर. या परिसरात सचिन ऊर्फ बांग्या रायसिंग नरवडे (२८) राहायचा. २९ एप्रिल २०१७ रोजीच्या रात्री तो घराबाहेर निघून गेला. मित्रांना भेटून येतो असे त्याने आईला सांगितले होते. नेहमीच तो मित्रांसोबत रात्री-अपरात्री भटकत असायचा. रात्री उशिरा घरी परतण्याची त्याची सवय त्याच्या घरच्यांनाही झाली होती. मात्र, त्या दिवशी दिवस उजाडला तरी तो घरी परतला नव्हता. त्याच्या आईने सर्वत्र शोधाशोध सुरू केला. परंतु त्याचा ठावठिकाणा काही लागत नव्हता. नेहमी त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांकडे त्याच्या आईने विचारपूस केली. पण, त्या दिवशी आपल्याला तो भेटलाच नसल्याचे मित्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे त्याच्या आईची काळजी वाढली आणि तिने तात्काळ कोपरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन तिने घडलेला प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यानंतर पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेतली. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. पण, त्यांच्या हाती काहीच लागत नव्हते. या तपासामध्ये बेपत्ता झालेल्या सचिनच्या नावावर घरफोडी, चोरी, मारामारी तसेच खंडणीचे गुन्हे तसेच काही वर्षांपूर्वी त्याला तडीपार करण्यात आल्याची माहिती पुढे आली होती. त्यामुळे सचिनच्या बेपत्ता होण्यामागे त्याच्या गुन्हेगारी पाश्र्वभूमीचा काही संबंध आहे का, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, त्यामध्येही पोलिसांना काही धागेदोरे सापडत नव्हते.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
chhota rajan marathi news, 213 burglary marathi news
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

एकीकडे कोपरी पोलिसांच्या पथकाकडून बेपत्ता झालेल्या सचिनचा शोध सुरू होता तर दुसरीकडे सचिनची आईदेखील त्याचा शोध घेत होती. कोपरी परिसरातील खाडीकिनारी भागात सचिन मित्रांसोबत अनेकदा जायचा. याबाबत त्याच्या आईला माहिती होती. त्यामुळे सचिनच्या शोधात ती खाडीकिनारी भागात गेली. तिथे फेरफटका मारत असताना तिला सचिनची एक चप्पल सापडली. तिने दुसऱ्या चप्पलचा शोध घेतला पण, तिथे तिला दुसरी चप्पल दिसून आली नाही. या चप्पलेमुळे सचिनचे काहीतरी बरेवाईट झाल्याचा संशय आल्याने त्याच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथे त्याच्या आईने चपलेबाबत माहिती देऊन सचिनच्या बेपत्ता होण्यामागे त्याच्या तीन मित्रांवर संशय व्यक्त केला. त्यामध्ये द्वारकानाथ ऊर्फ जयेश सोपान गावंड आणि सचिन ऊर्फ सुंबारी हरपाल राजोरिया या दोघांसह आणखी एका अल्पवयीन मुलाचा समावेश होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वागळे परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे आणि सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम.डी.जाधव यांच्या पथकाने तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली. या पथकामध्ये सहायक पोलीस निरीक्षक एस.बी.कदम, पोलीस उपनिरीक्षक व्ही.के.बाबर, पोलीस हवालदार डी.एस.पालांडे, टी.एन.डुंबरे, पोलीस नाईक आर.बी.शिंदे, आर.एन.रकटे, पोलीस शिपाई आर.जे.पारधी आणि पी.एच.जाधव यांचा समावेश होता. या पथकाने केलेल्या चौकशीत तिघांनी सचिनचा खून केल्याची कबुली दिली.

त्या दिवशी या तिघांसोबत सचिन दारू पिण्यासाठी राजनगर झोपडपट्टीच्या मागे असलेल्या खाडी भागात गेला होता. तिथे दारू पीत असताना सचिनने दारूच्या नशेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याचाच राग आल्याने तिघांनी डोक्यात दगड घालून सचिनचा खून केला. हा मृतदेह सापडल्यानंतर पोलीस आपल्यापर्यंत पोहचतील, अशी भीती तिघांना होती. त्यामुळे त्यांनी सचिनचा मृतदेह ओढत नेऊन खाडीच्या चिखलामध्ये खड्डा खोदून त्यात पुरला. त्यासाठी त्याने आणखी एका अल्पवयीन मित्राची मदत घेतली होती. तिघांच्या चौकशीत हा संपूर्ण घटनाक्रम समोर आला. त्यानंतर या चौघांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली तर दोघेजण अल्पवयीन असल्यामुळे त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर पोलिसांचे पथक चौघांना घेऊन घटनास्थळी गेले. या चौघांनी सचिनचा मृतदेह खाडीच्या चिखलात पुरला, त्यावेळेस ओहोटीची वेळ असल्यामुळे तिथे पाणी आटले होते. मात्र, पोलीस या चौघांना खाडीकिनारी भागात घेऊन गेले, त्यावेळेस मात्र भरतीची वेळ होती. असे असतानाही पोलिसांचे पथक जीव धोक्यात घालून खाडीतील दलदलीमध्ये उतरले आणि त्यांनी सचिनचा मृतदेह बाहेर काढून कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.