भाजपने उट्टे काढले ?

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (एस.टी.) कर्मचाऱ्यांचा संप चिघळल्याने सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत असले तरी सरकामध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. परिवहन खाते शिवसेनेकडे असल्याने संपाच्या आडून शिवसेना बदनाम होत असल्यास ते भाजपला हवेच आहे. तोडग्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच हस्तक्षेप करावा लागणार आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आंदोलनावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. या मागणीसाठी शिवसेना रस्त्यावर उतरली होती. अलीकडेच अंगणवाडी सेविकांच्या संपाला शिवसेनेने पाठिंबा दर्शविला होता. तसेच मोच्र्यात सहभागी होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर खापर फोडले होते. एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पहिल्या दिवशी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. मग सारी जबाबदारी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यावर सोपविण्यात आली. संपात तोडगा काढण्यात रावते यांना दोन दिवस यश आले नाही. याउलट सातवा वेतन आयोग देणार नाही या रावते यांच्या विधानाने संप चिघळल्याचा आरोप होत आहे.

दिवाळीच्या सणात ग्रामीण भागातील जनतेचे या संपामुळे हाल होत आहेत. खासगी वाहतूकदारांनी भाडय़ात वाढ करून प्रवाशांना वेठीस धरले आहे. वास्तविक सरकारने वेळीच हस्तक्षेप करून तोडगा काढणे आवश्यक होते. पण तीन दिवस झाले तरी संप मिटण्याची लक्षणे नव्हती. रावते यांनी वेनतवाढीबाबत काढलेला तोडगा मान्य करण्यास कामगार संघटनांनी नकार दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्याशिवाय संपात तोडगा निघणे शक्य दिसत नाही. संपामुळे शिवसेना अधिक बदनाम होत असल्याने संपात तोडगा काढण्याकरिता भाजपने विलंब लावल्याचा आरोप होत आहे. भाजप आणि शिवसेनेतील कुरघोडीच्या राजकारणातूनच संप चिघळल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.

संप चिघळल्याने प्रवाशांमध्ये निर्माण झालेली संतप्त भावना आणि शनिवारचा भाऊबिजेचा सण लक्षात घेता उद्या मुख्यमंत्री फडणवीस हे कर्मचारी संघटनेच्या नेत्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याची शक्यता आहे.

कर्जमाफी, बुलेटट्रेनप्रमाणेच एस.टी.ला न्याय मिळावा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारने ३५ हजार कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे. बुलेट ट्रेनसाठी सरकार खर्च करणार आहे. मग एस. टी. कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन देण्यास विरोध का केला जातो, असा सवाल राज्य इंटकचे प्रमुख माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी केला. रावते यांच्या कार्यपद्धतीवरही छाजेड यांनी टीका केली.

रावते यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यपद्धतीबद्दल एस. टी.चे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आक्षेप आहे. प्रवासी सेवा सुधारण्याऐवजी एस. टी. बसेसवर शिवसेना नेत्यांची छायाचित्रे झळकविणे, लोगोमध्ये जय महाराष्ट्र लिहिणे यालाच रावते यांनी प्राधान्य दिले. शिवशाही बसेस, तिकिटांसाठी ट्रायमेक्स यंत्रांचा वापर हे सारेच वादग्रस्त ठरले आहे. ट्रायमेक्स यंत्रांबाबत तर लोकायुक्तांकडे सध्या चौकशी सुरू आहे याकडे लक्ष वेधण्यात येते.

संपाला फूस कोणाची ?

एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपावरून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत राजकीय कुरघोडी करण्यात येत असली तरी त्यातून सरकारच्या विरोधात वातावरण तयार होत आहे. या संपाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची फूस असल्याचा सत्ताधारी गोटात संशय आहे. इंटक ही काँग्रेसप्रणित संघटना असून, अन्य नेत्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांची फूस असावी, अशी शक्यता व्यक्त केली जाते. मराठा समाजाच्या मोच्र्यावरून सरकारला घेरण्याकरिता विरोधकांकडून प्रयत्न झाले. ऐन सणासुदीच्या काळात संप करून सामान्य प्रवाशांची अडवणूक करणाऱ्याच्या मागेही विरोधी नेत्यांचा हात असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी थेट काँग्रेसवर खापर फोडले आहे.