परराज्यात धावणाऱ्या राज्य परिवहन सेवांच्या तुलनेत महाराष्ट्रातील एसटी पिछाडीवरच असल्याचे समोर आले आहे. गेल्या अनेक वर्षांत राज्यातील एसटीची कामगिरी आणि प्रगती कमीच झाल्याची खंत एसटी महामंडळाच्या वेतन सुधारणा समितीने केलेल्या परीक्षणातून व्यक्त करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे भूपृष्ठ वाहतुकीत एसटीचा वाटा हा अवघा १८ टक्केच असून तसे अहवालात नमून केल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले.

एसटी महामंडळाकडून नियुक्त करण्यात आलेल्या वेतन सुधारणा समितीच्या सदस्यांकडून आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्यांच्या दौरा करण्यात आला होता. या राज्यांतील राज्य परिवहन सेवेचा आढावा घेतानाच त्यांची कामगिरी, प्रगती तसेच कर्मचारी, कामगारांचा पगार इत्यादीची माहिती घेऊन अहवाल तयार केला. या अहवालातून कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबरोबरच अन्य राज्यातील राज्य परिवहन सेवेची कामगिरीही नमूद करण्यात आली. अहवालात नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील एसटीचे प्रवासी भारमान कमी आणि बस बिघाडाचे प्रमाण अधिक आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक दिवशी एसटीची कामगिरी पाहिली असता ती अन्य राज्यातील परिवहन सेवांच्या तुलनेत फारच मागे आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकासह अन्य राज्यात जवळपास ९५ ते ९९ टक्के राज्य परिवहन बस रस्त्यावर धावतात. परंतु महाराष्ट्रात सर्व बस रस्त्यावर न उतरवता एसटी बस धावण्याचे हेच प्रमाण ९१ टक्क्यांपर्यंत आहे. परराज्यांतील प्रत्येक राज्य परिवहन सेवांकडे मोठय़ा प्रमाणात एसी बस आहेत. आपल्याकडे एसी बसची संख्या कमी असून त्यात यापूर्वीच वाढली झाली पाहिजे होती. महत्त्वाची बाब म्हणजे तांत्रिकदृष्टय़ा अन्य राज्यातील एसटी बस सेवांनी बरीच प्रगती केलेली असतानाही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे अजूनही प्रगत झालेले नाही. परराज्यांतील परिवहन सेवेकडे जीपीएस यंत्रणांबरोबरच उद्घोषणा,मोबाईल अ‍ॅप, नियंत्रण कक्ष हे तांत्रिकदृष्टय़ा बरेच पुढे असल्याचे सांगण्यात आले आहे.

  • ज्या पाच राज्यांतील राज्य परिवहन बस सेवेचा आढावा घेण्यात आला त्यांचे प्रवासी भारमान हे महाराष्ट्रातील एसटीच्या भारमानापेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले. पाच ते दहा टक्के भारमान अधिक असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
  • उत्तर प्रदेश, अहमदाबाद, कर्नाटकमधील बस स्थानके ही अत्याधुनिक बनली आहे. सीसीटीव्हींपासून, पाण्याची व्यवस्था, बसण्याच्या व्यवस्थेपासून सर्व काही त्यांना विमानतळासारखी रचना करण्यात आली असून प्रवाशांसाठी सर्व सुविधाही उपलब्ध असल्याचे सूत्रांनी सांगितले.
  • १९९१ पर्यंत महाराष्ट्रात यापूर्वी भूपृष्ठ वाहतुकीत एसटीचा वाटा ४० टक्के एवढा होता. त्यानंतर तो कमी होऊ लागला आणि आता अवघ्या १८ टक्क्यांपर्यंतच आला आहे.