रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याने लागण

पावसाळ्यासोबतच मुंबईत स्वाइन फ्लूचा प्रभाव वाढत चालला असून लहान मुलांमध्ये या आजाराची लागण होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे निरीक्षणाअंती आढळून आले आहे. चालू महिन्यांत स्वाइन फ्लूने दगावलेल्या पाच रुग्णांमध्ये एका चार वर्षीय बालकाचा समावेश होता. तर आतापर्यंत या आजाराची लागण झालेल्या लहान मुलांची संख्या ६०वर पोहोचली आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांची विशेष काळजी घ्यावी व स्वाइन फ्लूची लक्षणे दिसताच तातडीने उपचार द्यावेत, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

आतापर्यंत सर्दी, खोकला, घसा दुखणे ही स्वाइन फ्लूची लक्षणे होती. मात्र या वर्षी उलटी, ताप, अतिसार ही लक्षणे असलेल्या रुग्णांच्या रक्ततपासणीच्या अहवालात स्वाइन फ्लूचे निदान होत आहे. सध्या सहा महिन्यांच्या बालकांनाही स्वाइन फ्लूची बाधा होत आहे. आतापर्यंत पालिकेकडे दाखल झालेल्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या ५० ते ६० पर्यंत पोहोचली आहे. १ ते २२ जूनपर्यंत ३१३ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. त्यात ५६ टक्के पुरुष व ४४ टक्के महिलांचा समावेश आहे. यात साधारण ४० ते ४५ रुग्ण १४ वर्षांखालील आहेत. तर जुलै महिन्याच्या १५ दिवसांत २५० जणांना स्वाइन फ्लूची बाधा झाली असून यात पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्येही एका बालकाचा समावेश आहे.

रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याने लहान मुलांना स्वाइन फ्लूसारख्या विषाणूजन्य आजारांची लागण होण्याची शक्यता अधिक असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. ‘लहान मुलांना कायम सर्दी, खोकल्याचा त्रास असतो. त्यामुळे ही लक्षणे स्वाइन फ्लूची आहेत याची माहिती समोर येत नाही. एक वर्ष वयापर्यंतच्या मुलांना होणारा त्रास ते व्यक्तही करू शकत नाहीत,’ असे कोहिनूर रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ विभागाचे डॉ. रोहित नार्वेकर यांनी सांगितले. चालू महिन्यात १० लहान मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही केवळ दाखल झाल्याची संख्या असून दाखल न झालेल्यांची संख्या याहून खूप जास्त आहे, असेही ते म्हणाले.

लहान मुलांमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी प्रत्येक वेळेस त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसते. सध्या जे.जे. रुग्णालयात तपासणी करण्यासाठी आलेल्या अनेक लहान मुलांना घरातच उपचार दिले जात आहेत, असे जे.जे.रुग्णालयातील बालरोगविभागाचे सहप्राध्यापक डॉ. सुशांत माने यांनी सांगितले. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना स्वाइन फ्लूची लागण होते. यामध्ये वृद्ध व गर्भवती महिलांचाही समावेश आहे. मात्र घराबाहेर असताना स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे आजाराची लागण होते, असे वांद्रेतील डॉ. एल. सामंत यांनी सांगितले.