विलेपार्ले रेल्वे स्थानक
विलेपार्ले उपनगराने गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या मराठमोळ्या संस्कृतीची ओळख उराशी जपली आहे. स्थानकातून बाहेर पडलो की याचा पावलोपावली प्रत्यय येतो. त्यामुळे आधुनिक मुंबई सर्व प्रांतीय नागरिकांच्या वावराने गजबजलेली असताना या स्थानकातून बाहेर पडल्यावर मात्र मराठमोळे वातावरण पाहून एखादा नवखा प्रवासी नक्कीच सुखावून जाईल. याला कारणीभूत आहेत ते या उपनगराच्या उरात दडलेली पार्ले टिळक विद्या मंदिरासारख्या शाळा, साठय़े व मिठीबाई ही महाविद्यालये, दीनानाथ नाटय़गृह आणि अस्सल मराठी चवीची खाद्यकेंद्रे ही आद्य ठिकाणे. स्थानकातून पूर्वेला बाहेर पडताक्षणीच दीनानाथ नाटय़गृहाची वास्तू दिसते. या वास्तूकडे बघतो न बघतो तोच या वास्तूवरून मोठय़ा आवाजात जाणारे विमान अनेकांचे लक्ष आकर्षून घेते. येथे एक आनंदाची बाब म्हणजे महात्मा गांधी रस्ता व पार्लेश्वर रस्त्यांना अजूनही काही अपवाद वगळता मोठय़ा संख्येने टॉवरने घेरलेले नसून अजूनही येथे जुन्या एक मजली मात्र बंद चाळींचे दर्शन होते. पार्लेश्वर रस्ता व वर्तक चौक येथून आत गेल्यावर जुन्या बंगल्यांच्या वसाहती असून येथील रस्त्यावरून वावरणारा आपला सहप्रवासी हा मराठी भाषिक असल्याची जाणीव ही तात्काळ होते. तसेच स्थानकाच्या डोक्यावरून आलेल्या स्कायवॉकवरून पूर्वेकडे शिरतानाच्या समोरच्या रस्त्यावर दुतर्फा कपडे व अन्य उत्पादनांची दुकाने आणि त्यांच्या पुढय़ात फळे व भाज्यांची बाजारपेठ लांबपर्यंत पसरली आहे, त्यामुळे घरी जाणाऱ्या पार्लेकरांना घरी जाताना साऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. त्यातही ही बाजारपेठ आंब्याने सध्या बहरून गेली आहे. स्थानकाभोवती भटकताना पार्लेकरांनी एका बाबतीत नशीब काढलेले दिसते, कारण किमान स्थानक परिसरातील सर्वच रस्ते हे रुंद व खड्डेविरहित दिसतात. त्यामुळे अनेक मुंबईकरांप्रमाणे किमान स्थानक परिसरात खड्डे नाहीत याला थोर नशीबच असावे लागते. याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे पूर्वेकडील स्थानक परिसर हा चहूबाजूंनी खाद्य केंद्रांनी घेरलेला असून मी मराठी, पुरेपूर कोल्हापूर, बाबू वडापाव, फडके उद्योग मंदिर त्याचप्रमाणे उडपी हॉटेल आणि अन्य पदार्थाचे ठेले. त्यामुळे स्थानकात आलेल्याला उत्कृष्ट चवीचे पदार्थ हाकेच्या अंतरावर उपलब्ध आहेत. थोडक्यात, सांगीतिक कार्यक्रम असो की साहित्यिक कार्यक्रम, खाद्य केंद्र असो वा जुन्या वसाहती यामुळे या उपनगराने आधुनिक होताना आपली मातीत रुजलेली मुळे अजून घट्ट केल्याचा भास या स्थानकातून बाहेर पडताना होतो.
विरंगुळा व मनोरंजन
स्थानकाच्या बाहेरच नाटय़प्रेमी रसिकांची निकड पूर्ण करणारे दीनानाथ नाटय़गृह आहे. या नाटय़गृहाच्या अस्तित्वामुळे सांस्कृतिक उपनगर ही विलेपार्लेची ओळख द्विगुणित झाली आहे. तसेच अनेक मराठी कलावंतांची उपस्थिती या परिसरात दिसते. तसेच महात्मा गांधी रस्त्यावर विशेष खास नसले तरी किमान काही मिनिटांच्या विरंगुळ्यासाठी आनंदीबाई केसकर उद्यान विसाव्यासाठी आहे. या मनोरंजन केंद्रांच्या बाहेर आणि विशेषत: स्थानकाच्या बाहेरील भागात मात्र खाऊच्या केंद्राच्या नावाखाली वडा, भजी, सरबत यांच्या टपऱ्या असून खाद्य दर्जा नसलेली ही केंद्रे मात्र आपले स्थान बळकट करत आहेत. इतर मुंबईतही यांची संख्या जास्त असली तरी पाल्र्यातील त्यांचे अस्तित्व खटकते.
साठय़े, डहाणूकर व मिठीबाई
आपल्या नावांनी अनेक दर्जेदार, गुणवान आणि विशेषत: कलावंत घडवलेली मुंबईत काही थोडकीच महाविद्यालये आहेत. पूर्वेला साठय़े आणि डहाणूकर महाविद्यालय आणि पश्चिमेला मिठीबाई महाविद्यालय असून एकांकिका, नाटके, सांस्कृतिक कार्यक्रम व याचबरोबरीने शैक्षणिक नैपुण्य कमावलेले विद्यार्थी येथे होऊन गेले आहेत. यामुळे वलय प्राप्त झालेल्या या महाविद्यालयांनी या उपनगराला वेगळी ओळख मिळवून दिली आहे. यामुळे साहजिकच तरुणाईचा वावर या उपनगरात ठिकठिकाणी दिसतो. त्यामुळे आकर्षण म्हणून का असेना या महाविद्यालयांना एखाद्या नवख्याने भेट द्यायला हरकत नाही.

विलेपार्ले स्थानकातून बाहेर पडताक्षणीच अर्धशतकाची स्वादिष्ट परंपरा असे बिरुद मिरवणारे ‘बाबू वडापाव’ हे टपरीवजा दुकान लागते. दोन ते तीन प्रकारच्या आंबट-गोड चटण्यांबरोबरीने इथला वडापाव खाण्यासाठी अनेक जण गर्दी करतात. पार्लेश्वर रस्त्यावरून पुढे गेलात तर प्रथम अस्सल तांबडा-पांढरा रस्स्याची चव देणारे आणि सामिष आहार पुरवणारे ‘पुरेपूर कोल्हापूर’ लागते. ‘पुरेपूर कोल्हापूर’ ओलांडत नाही तोच ताजे व खास पदार्थाचे पूर्वीपासून असलेले फडके उद्योग मंदिर दृष्टीस पडते. तिथून चौकात ‘मी मराठी’ मराठमोळी शाकाहारी खाद्य संस्कृती असा फलक लावलेले आणि फक्त महाराष्ट्रीय कुटुंबात मिळणाऱ्या पदार्थाचे केंद्र लागते. मग, इथे थालीपीठ, आमरस पुरी, वडा-भजी, झणझणीत मिसळ, कोथिंबिर वडय़ा, पन्हे असे एक से एक पदार्थ खवय्यांना तृप्त करतात.