अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची निवडणूक रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. मुंबई विभागात १,२५७ मतपत्रिका बनावट आढळल्याने निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रमुख निवडणूक अधिकारी विश्वास ठाकूर यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रारंभापासून वादग्रस्त ठरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळी मुंबईसह महाराष्ट्रात सुरू झाली. त्यावेळी मुंबई विभागात बनावट मतपत्रिका आढळल्याने तेथील मतमोजणी स्थगित करण्यात आली होती. याच कारणास्तव नाट्य परिषदेच्या इतर विभागांचे निकालही राखीव ठेवण्यात आले होते. ही निवडणूक रद्द करून नव्याने निवडणूक घ्यावी, अशी मागणी ‘उत्स्फूर्त’ आणि ‘नटराज’ या दोन्ही पॅनलने केली होती.