अनधिकृत व परप्रांतीय फेरीवाल्यांनीच मुंबईची वाट लावली आहे. महाराष्ट्रातील भूमिपुत्रांनी फेरीवाल्यांचा व्यवसाय केल्यास आमचा विरोध राहणार नाही. मात्र, परप्रांतीय फेरीवाले व त्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, त्यामुळेआझाद मैदावार फेरीवाल्यांनी मोर्चा काढला तर त्यांना ‘मनसे स्टाइल’ उत्तर दिले जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी फेरीवाल्यांना दिला. राज यांच्या या इशाऱ्यामुळे मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेची नवी आखणी करण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
येत्या सोमवारी मुंबईतील फेरीवाले आझाद मैदानावर मोर्चा काढणार आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांच्यावरील कारवाईनंतर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मंगळवारी राज ठाकरे यांनी वरीलप्रमाणे इशारा दिला. परप्रांतीय फेरीवाल्यांना हाकललेच पाहिजे, त्यांच्याऐवजी मराठी फेरीवाले चालतील अशी भूमिकाही राज यांनी घेतली. परप्रांतीय फेरीवाल्यांमुळे मुंबईची पुरती वाट लागली आहे.
कोणीही येते व कोठेही बसतात. त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या पोलिसांवरच कारवाईचा बडगा उगारला जातो. असेच चालणार असेल तर अनधिकृत गोष्टींवर कारवाई करण्याची हिम्मत कोणी दखवणार नाही. प्रश्न केवळ ढोबळे यांच्या बदलीचा नाही तर अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईसाठी पोलीस फोर्स मिळणार की नाही हा आहे, असे राज म्हणाले.
सरकार बदलण्याची गरज
अनधिकृत बांधकामासह सर्वच अनधिकृत गोष्टींबाबत सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. दुर्दैवाने सरकारला सांगून काही उपयोग नाही. मतांच्या लाचारीसाठी परप्रांतीय फेरीवाल्यांना सांभाळले जात असून हे सरकारच बदलण्याची गरज असल्याची टीकाही राज यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी ढोबळेंच्या बदलीचा निर्णय घेतला. आघाडी सरकार असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचा निर्णय आम्हाला मान्य असल्याचे सांगणाऱ्या अजित पवार यांनी, श्वेतपत्रिकेची घोषणा झाल्यानंतर त्याला विरोध का केला असा सवालही राज यांनी या वेळी केला.