२०१३ मध्ये घोषणा होऊनही अद्याप अंमलबजावणी रखडलेलीच

ज्येष्ठ नाटककार आणि कवी वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या दिवशी (२७ फेब्रुवारी) मराठी भाषेचे गोडवे गात आणि महती सांगत ‘मराठी भाषा दिवस’ साजरा केला जातो. मराठी भाषेचे गोडवे गात असताना मुंबईत ‘मराठी भाषा भवन’ उभारण्याच्या घोषणेला मुहूर्त कधी मिळणार हा प्रश्नच आहे. चार वर्र्षांनंतरही मराठी भाषा भवन अद्याप उभारले गेलेले नाही.

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१३ मध्ये मराठी भाषा भवन उभारण्याची घोषणा विधिमंडळात केली होती. पुढे राज्यात सत्तांतर झाले. मात्र अद्याप तरी मराठी भाषा भवनाची एकही वीट रचली गेलेली नाही. मराठी भाषा आणि भाषेशी संबंधित सर्व विभाग एकाच मांडवाखाली आणण्यासाठी मराठी भाषा भवन उभारण्याबाबत चर्चा आणि घोषणा झाल्या. मराठी भाषा भवनात राज्य शासनाचे भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ आदी सर्व विभाग घोषणेनुसार एकत्र काम करणार होते. मात्र अद्यापही हे सर्व विभाग एका छताखाली आले नसून वेगवेगळ्या ठिकाणीचकाम करत आहेत.

मराठी भाषा भवनाचे भुमिपूजन अद्याप झालेले नाही तर ते बांधायची गोष्ट तर दूरच राहिली. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सोमवार, २७ फेब्रुवारीस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून मराठी भाषेचे गोडवे पुन्हा एकदा गायले जातील. पण घोषणा झालेले आणि कागदावर असलेले मराठी भाषा भवन प्रत्यक्षात कधी अस्तित्वात येईल? असा प्रश्न मराठी भाषाप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.

भाषा, साहित्य व संस्कृतीकडे दुर्लक्ष

यशवंतराव चव्हाण यांचा कार्यकाळ वगळला तर मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती या विषयाकडे सर्वच राजकीय पक्ष व सरकारांनी सर्वार्थाने दुर्लक्ष केले आहे. त्यासाठी केवळ राजकीय पक्ष, नेते व राज्य शासनच फक्त जबाबदार नाही तर मराठी भाषिक लोकही तेवढेच जबाबदार आहेत. मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीबाबत मराठी भाषिकांनी जे बळ देणे आणि जनमताचा रेटा लावणे आवश्यक आहे. पण ते होत नाही. त्यामुळे अन्य काही विषयांप्रमाणेच मराठी भाषा भवनाची घोषणाही आता विस्मृतीत गेल्यासारखीच आहे.   – डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

 

वांद्रे आणि नवी मुंबई येथे जागा निश्चित

‘मेट्रो रेल्वे’ आणि ‘शांतता क्षेत्र’ या दोन मुद्दय़ांमुळे ‘रंगभवन’ येथे मराठी भाषा भवन बांधता येणार नाही. त्यामुळे आता वांद्रे-कुर्ला संकुल आणि नवी मुंबई या दोन ठिकाणी मराठी भाषा भवनासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणच्या जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून ती पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यात येईल. भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ या सर्व विभागांनी एकत्र काम करावे, हा उद्देश मराठी भाषा भवन उभारण्यामागे आहे.   – विनोद तावडे, मंत्री, मराठी भाषा विभाग