मराठी भाषा दिनानिमित्त आज लोकार्पण

राज्याच्या विश्वकोश निर्मिती मंडळाने तयार केलेले मराठी भाषेवरील विश्वकोशाचे २० खंड सध्या ग्रंथ स्वरूपात उपलब्ध असून वाचकांच्या सोयीसाठी आता हे खंड ‘पेनड्राईव्ह’मध्ये देखील उपलब्ध होणार आहेत. ‘महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ’, ‘ग्रंथाली’ व ‘बुकगंगा.कॉम’ आदींच्या सहकार्याने हे खंड ‘पेनड्राईव्ह’मध्ये उपलब्ध होणार असून संगणकावर हे खंड ‘युनिकोड फॉण्ट’च्या स्वरूपात वाचता येतील. २७ फेब्रुवारीच्या मराठी भाषा गौरव दिनी मुंबईत ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे सायंकाळी ६.३० वाजता शासनाच्या वतीने आयोजित केलेला ‘मराठी भाषा सोहळा’ रंगणार असून या सोहळ्यातच या ‘पेनड्राईव्ह विश्वकोशा’चे लोकार्पण करण्यात येईल.

मराठी विश्वकोशांची निर्मिती ही महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत करण्यात आली असून हे विश्वकोश मराठी भाषेतील ज्ञानकोश आहेत. या विश्वकोशांमध्ये १०० विषयांवरील विविध नोंदीचा समावेश आहे.

सध्या विश्वकोशाच्या या २० खंडांमधील ३१२ सूची आणि १८ हजार १६३ लेख आता ‘पेनड्राईव्ह’द्वारे मराठी रसिक वाचकांसमोर येणार आहेत. या पेनड्राईव्हमध्ये विश्वकोशाचे अ‍ॅप्लीकेशन असून संगणक किंवा लॅपटॉपवर हे अ‍ॅप्लीकेशन इन्स्टॉल करून ते युनिकोड फॉण्ट स्वरूपात वाचता येईल. तसेच, या २० खंडांमधील संपूर्ण सूची, विविध नोंदी किंवा विषयवार नोंदी शोधण्याची सुविधा या अ‍ॅप्लीकेशनमध्ये उपलब्ध असल्याने वाचकांना या खंडांमधील कोणताही भाग क्षणार्धात शोधता येऊ शकेल.

यामुळे चोखंदळ मराठी वाचकांना मराठी भाषा दिनी ‘पेनड्राईव्ह विश्वकोशा’ची अनोखी भेट मिळणार आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे मराठी भाषा व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी या ‘पेनड्राईव्ह विश्वकोशा’चे लोकार्पण पार पडेल. ‘ग्रंथाली’ व ‘बुकगंगा.कॉम’ यांच्या तंत्रज्ञान आणि वितरण सहाय्याने हा पेनड्राईव्ह ८०० रूपयांत वाचकांना मिळणार आहे. बुकगंगाच्या संकेतस्थळावर किंवा ८८८८३००३०० या क्रमांकावर या पेनड्राईव्ह विश्वकोशाची नोंदणी करता येईल असे ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले. याची नोंदणी करणाऱ्या पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना ज्येष्ठ गीतकार गुलजार यांच्या ‘बोस्की’च्या गोष्टी या ९ पुस्तकांच्या संचासह हा पेनड्राईव्ह १२०० रूपयांना मिळणार असून पहिल्या १०० वाचकांना ‘संकल्पना कोशांचे ५ खंड’ व हा पेनड्राईव्ह हे २६०० रूपयांत दिले जाणार असल्याचे हिंगलासपूरकर यांनी सांगितले.