हृदयाला भिडणाऱ्या, मनाच्या जाणिवा रुंदावणाऱ्या आणि बुद्धीलाही संस्कारित करणाऱ्या शब्दरचनेतून मराठी कवितेत आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे कवी, संमेलन आणि संगीत मैफलीतील सूत्रसंचालनाचा, निवेदनाचा आदर्श वस्तूपाठ घालून देणारे अजातशत्रू साहित्यिक प्रा. शंकर वैद्य (८६) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी पहाटे दादर येथील शुश्रुषा रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पुत्र निरंजन, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. समीक्षक, ललित लेखिका आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या माजी संचालक दिवंगत प्रा. सरोजिनी वैद्य या त्यांच्या पत्नी होत.   
प्रा. सरोजिनी यांच्याप्रमाणेच प्रा. शंकर वैद्य यांच्या शांतसात्त्विक वृत्तीचे प्रासादिक प्रतिबिंब त्यांच्या साहित्यातही उमटले होते. अरुण दाते यांनी गायलेल्या, पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि रसिकांच्या मनावर गेली अनेक वर्षे अधिराज्य गाजविणाऱ्या ‘स्वर गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’ या गाण्याची शब्दरचना शंकर वैद्य यांचीच आहे. ‘शिवकल्याण राजा’ या कार्यक्रमातील ‘शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला’ हे लोकप्रिय गाणेही वैद्य यांचेच आहे.   
श्वास घ्यायला त्रास होत असल्याने सोमवारी दुपारनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालविली. वैद्य यांच्या निधनाने मराठी काव्यरचनेचा प्रदीर्घ आणि सखोल अभ्यास व अध्ययन असलेला आणि संत ज्ञानेश्वर ते तुकाराम, मर्ढेकर ते केशवसुत आणि आजच्या आधुनिक कवितेवर अधिकारवाणीने अभ्यासपूर्ण समीक्षात्मक लेखन आणि भाष्य करणारा कवी हरपला असल्याची भावना मराठी साहित्य वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.
वैद्य यांचे पार्थिव त्यांच्या दादर (पश्चिम) येथील ‘कामदार सहकारी गृहनिर्माण संस्थे’तील निवासस्थानी आणण्यात आले. ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ, अशोक कोठावळे यांच्यासह कवी रामदास फुटाणे, अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, डॉ. महेश केळुस्कर, नलेश पाटील, चंद्रशेखर सानेकर, प्रा. विसुभाऊ बापट, तसेच माजी आमदार शिशिर शिंदे, मीना प्रभू, उषा मेहता, सुहासिनी किर्तीकर, रविंद्र आवटी, अशोक हांडे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षा प्रा. उषा तांबे आदी मान्यवरांनी पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यानंतर शीव स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीत वैद्य यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लेखः मुग्ध, रसील्या कवितेचा धनी

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
election material making work increase due to parties splits
पक्षफुटींमुळे प्रचार साहित्याला ‘अच्छे दिन’; झेंडे, टोप्या, फेटे निर्मितीस सुरुवात, चिन्हे जास्त असल्याने कामात वाढ
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान