दिवंगत शंकर वैद्य यांचा जन्म १५ जून १९२८ रोजी पुणे जिल्ह्य़ातील ओतूर येथे झाला. वैद्य यांची प्रामुख्याने ओळख कवी आणि कोणत्याही कवी संमेलनाचे किंवा संगीत मैफलीचे रसाळ सूत्रसंचालक/निवेदक किंवा निरुपणकार अशी असली तरी ते कथाकार, समीक्षक आणि चांगले वक्तेही होते. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणूनही त्यांचा लौकिक होता. पुणे विद्यापीठातून ‘एम.ए.’ची पदवी त्यांनी मिळविली होती.
मुंबईतील एलफिन्स्टन आणि इस्माईल युसूफ महाविद्यालय तसेच अमरावती येथील विदर्भ महाविद्यालात त्यांनी काही काळ अध्यापनही केले होते. प्रा. वैद्य यांची कवी म्हणून ओळख असली तरी त्यांचे पहिले प्रकाशित पुस्तक ‘आला क्षण गेला क्षण’ हा कथा संग्रह होता. १९६१ मध्ये तो प्रकाशित झाला. त्यानंतर मात्र वैद्य यांचे काव्यसंग्रहच प्रकाशित झाले. यात ‘कालस्वर’, ‘दर्शन’, ‘बादली’, ‘आम्ही पालखीचे भोई’ आदी काव्यसंग्रह गाजले.
‘आदित्य-कवी मनमोहन’, ‘प्रवासी पक्षी- कुसुमाग्रज’, रसयात्रा’ या ग्रंथांचे संपादनही त्यांनी केले होते. वैद्य यांच्या कवितांमधून निसर्गाबरोबर प्रेमाच्या ओढीची, गाढ तृप्तीची अनुभूती येते. तर काही कवितांमधून तत्त्वचिंतन, कल्पना चमत्कृती, हृद्य शब्दरचना, संयत अविष्कार आणि कवितेच्या अनुभुतीनुसार येणारे रचनाबंध पाहायला मिळतात. संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम, कवी मर्ढेकर ते केशवसुत यांच्यावर त्यांनी समीक्षात्मक लेखन आणि अनेक व्याख्यानेही दिली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील निमंत्रितांच्या कवी संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी अनेक वेळा भूषविले होते. पं. हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर यांच्या काही मैफलींचे सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. ‘दूरदर्शन’च्या सह्णााद्री वाहिनीवर खूप वर्षांपूर्वी लता मंगेशकर यांनी सादर केलेल्या संत ज्ञानेश्वरांच्या रचनांचा कार्यक्रम प्रसारित झाला होता. या कार्यक्रमाचे रसाळ आणि अभ्यासपूर्ण निवेदन  प्रा. वैद्य यांचेच होते. अनेक साहित्यविषयक कार्यक्रम, पुस्तक प्रकाशन, चर्चा, परिसंवादामध्येही प्रा. वैद्य सहभागी झाले होते. मिश्कील शैलीतील पण तरीही अभ्यासपूर्ण असलेले त्यांचे भाषण हे साहित्यरसिकांसाठी मेजवानी असायचे. अलिकडे वृद्धापकाळामुळे समारंभ आणि कार्यक्रमामध्ये त्यांची फारशी उपस्थिती नसायची. पण तरीही शक्य असेल तेव्हा ते साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रमांना अवश्य उपस्थित राहायचे. त्यांच्या केवळ उपस्थितीनेही कार्यक्रमस्थळी चैतन्य पसरायचे.
साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र सरकार, कोकण मराठी साहित्य परिषद, वाग्विलासिनी, मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानच्या पुरस्कारासह अनेक अन्य पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. प्रचंड ताकदीची स्मरणशक्ती, मनमिळाऊ स्वभाव ही त्यांची खास वैशिष्टय़े.
विद्यार्थ्यांबरोबरच मराठी साहित्य वर्तुळात ते ‘सर’ म्हणून परिचित होते. दादर येथील उड्डाणपुलाला कवी केशवसुत यांचे नाव देण्यासाठी वैद्य यांनीच पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नातून या पुलाला ‘कवी केशवसुत उड्डाणपूल’असे नाव देण्यात आले.