विद्यापीठाच्या बृहद् आराखडय़ाला मान्यता देण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच एकाच दिवशी व्यवस्थापन, विद्वत परिषद आणि अधिसभा यांच्या एकामागोमाग याप्रमाणे ‘मॅरेथॉन’ बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत बृहद् आराखडय़ाला मान्यता मिळविली जाईल. त्यानंतर तासाभरात व्यवस्थापन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तर तीन वाजता अधिसभेची बैठक घेऊन बृहद् आराखडा अंतिम करण्यात येणार आहे.

आपापला बृहद् आराखडा पाठविण्यासाठी विद्यापीठांना २१ नोव्हेंबपर्यंतची मुदत राज्य सरकारने दिली आहे. त्याला मान्यता मिळाल्यानंतर विद्यापीठांना नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव मागविता येणार आहेत. नियमानुसार विद्यापीठाच्या ‘बोर्ड ऑफ कॉलेज अ‍ॅण्ड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट’ने (बीसीयूडी) तयार केलेल्या आराखडय़ाला व्यवस्थापन, विद्वत परिषद व अधिसभा या प्राधिकरणांचीही मान्यता घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय तो ‘राज्य शिक्षण परिषदे’कडे मान्यतेकरिता पाठविता येत नाही. बीसीयूडीने १६ नोव्हेंबरला बृहद् आराखडा तयार केला. त्यावर आता एकाच दिवसात तिन्ही प्राधिकरणांकडून मान्यतेची मोहोर उमटवून घेण्याचे मुंबई विद्यापीठाने ठरविले आहे. ही प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात राज्य सरकारची मान्यता मिळून विद्यापीठांचे बृहद् आराखडे संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातील, अशी अपेक्षा आहे.
अधिसभा १७ जणांची
अधिसभेची मुदत संपल्याने केवळ प्राधिकरणांवरील नामनिर्देशित आणि पदसिद्ध सदस्यांच्या उपस्थितीत या बैठकी घेण्यात येणार आहेत. एरवी अधिसभेला १०० ते ११० सदस्य उपस्थित असतात, पण गुरुवारची अधिसभा केवळ १७ सदस्यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर व्यवस्थापन परिषदेला अवघे सात सदस्य उपस्थित असतील. यात निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश नसल्याने प्रश्नोत्तरे व चर्चेला फारसा वाव नसेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. दरम्यान, कुलगुरूंच्या अधिकारात नियुक्त करावयाच्या तीन शिक्षक आणि एक शिक्षकेतर कर्मचारी अशा चार सदस्यांची नियुक्ती अधिसभेवर करण्यात आली आहे. नियंत्रक पदासाठीच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेतून कोणाला पाठवायचे याचा निर्णयही घेण्यात येणार आहे. नियंत्रक पदाकरिता सुमारे २५ जणांनी अर्ज केले आहेत. त्याच्या अर्जाची तपासणी सुरू आहे. त्यानंतर निवडल्या गेलेल्या अर्जाआधारे व मुलाखतीद्वारे निवड समिती परीक्षा नियंत्रकांची निवड करेल.