रहिवाशांची भेट न घेताच ‘युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी’ रवाना

मरिन ड्राइव्हला जागतिक वारसा परिसर म्हणून दर्जा देण्याबाबत पाहणी करण्याकरिता आलेली ‘युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज कमिटी’ रहिवाशांची भूमिका जाणून न घेताच रवाना झाल्याने या भागातील रहिवाशांमधील नाराजी कायम आहे.

६० ते ७० वर्षांपूर्वी विकसित झालेल्या मरिन ड्राइव्हला जागतिक वारसा परिसराचा दर्जा देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला येथील स्थानिक रहिवाशांचा जोरदार विरोध असून ‘युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी’ याच अनुषंगाने परिसराची पाहणी व स्थानिकांशी चर्चा करण्यासाठी नुकतीच मुंबईच्या भेटीवर आली होती. मात्र समितीचे सदस्य भेटले नसल्याचा आरोप जागतिक वारसाला विरोध दर्शवणाऱ्या स्थानिक नागरिकांनी केला आहे. या परिसराला जर जागतिक वारसाचा दर्जा दिला गेला तर ६० ते ७० वर्षांपासून उभ्या असलेल्या येथील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला खीळ बसेल, अशी भीती रहिवाशांना आहे. त्यामुळे मरिन ड्राइव्ह येथील ए, बी, सी, डी परिसरातील ३७ इमारतीतील रहिवाशांनी याला विरोध दशर्विला आहे.

मुंबई महापालिका व नगरविकास खाते स्थानिक नागरिकांना अंधारात ठेवत मरिन ड्राइव्हला जागतिक वारसा देण्याचा घाट घालत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या परिसराला जागतिक वारसाचा दर्जा देण्याबाबत अहवाल तयार करण्यासाठी युनेस्कोच्या मुंबईत आलेल्या प्रतिनिधींनी स्थानिकांची मते जाणून घेणेही अपेक्षित होते. या प्रतिनिधींनी केवळ या प्रस्तावाला समर्थन देणाऱ्या काही नागरिकांचीच भेट घेतली. मात्र विरोध करणाऱ्या रहिवाशांची भेट न घेताच हे प्रतिनिधी निघून गेल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. त्यामुळे ज्या इमारतींच्या पुनर्विकासाला फटका बसणार आहे, अशा ३७ इमारतींमधील रहिवासी पुन्हा एकवटले आहेत.

दरम्यान, या निर्णयाला विरोध असलेल्या नागरिकांनी आपापली मते मला पाठवली आहेत. त्याचा अभ्यास करून लवकरच मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार असल्याचे स्थानिक आमदार राज पुरोहित यांनी सांगितले आहे.

युनेस्कोची समिती मुंबई भेटीवर आल्याचे वृत्त आम्हाला वर्तमानपत्रातूनच समजले. मात्र आजतागायत पालिका, शासकीय अधिकारी किंवा युनेस्कोचे प्रतिनिधी आमच्या भेटीला आले नाहीत. त्यामुळे आम्ही सर्व रहिवासी मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र लिहून आमच्या इमारतींचा पुनर्विकास कसा करायचा याबाबत जाब विचारणार आहोत. पुनर्विकास करणे शक्य असेल तर ते पालिका आयुक्तांनी लेखी द्यावे. तसेच पुनर्विकास कोणत्या आधारे करायचा याबाबत लेखी स्पष्टीकरण द्यावे.

 –कनवल शहापुरी, रहिवासी, हरी निवास. 

मुंबई भेटीवर आलेल्या युनेस्कोच्या प्रतिनिधींनी स्थानिकांची भेट घेतली. मात्र त्यांच्यात व स्थानिकांमध्ये काय संवाद झाला याबाबत काही माहिती नाही. त्यांचा अहवाल आल्यावरच पुढील दिशा ठरेल.

नितीन करीर, प्रधान सचिव, नगर विकास विभाग