पणत्या, टपोऱ्या-पांढऱ्याशुभ्र मोत्यांची तोरणे, रांगोळी, रंगीबेरंगी कंदिलापासून ते कपडय़ांपर्यंतच्या खरेदीकरिता मुंबईकरांनी धनत्रयोदशीचाही मुहूर्तही वाया जाऊ दिला नाही. खरेदीदारांच्या गर्दीने गुरुवारी मुंबई, विलेपार्ले, लालबाग-परळ, मालाड, बोरिवली, घाटकोपर अशा सर्वच ठिकाणच्या बाजारपेठा फुलून गेल्या होत्या.

हिऱ्यामोत्यांनी अतिशय सुबकरीत्या बनविलेली तोरणे, एलईडी दिव्यांच्या माळा, कंदील, उटणी, पणत्या, रांगोळी, कपडे, चादरी अशा कित्येक वस्तूंच्या खरेदीकरिता मुंबईकरांनी महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. पणत्या आणि कंदील याशिवाय दिवाळीला शोभा नाही. या वर्षी बाजारात नवनवीन प्रकारच्या रंगीत पणत्या विक्रीला आहेत. यात पाण्यावर तरंगणाऱ्या, दिवे असलेल्या पणत्यांचाही समावेश आहे. मातीच्याही निरनिराळ्या आकारांच्या सुबक पणत्या उपलब्ध आहेत. तोरणांमध्ये रंगीत, चकाकणाऱ्या मण्यांपासून हाताने बनविलेल्या तोरणांनाही ग्राहक पसंती देत आहेत. एलईडी बसविण्यात आल्याने या तोरणांची शान आणखीच वाढली आहे. विविध कलाकुसर केलेल्या तयार रांगोळ्यांनाही यंदा बाजारात मागणी होती. या रांगोळ्यांची किंमत १५० पासून ८०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. याचप्रकारे छापील रांगोळ्याही मोठय़ा प्रमाणात विकल्या जात आहेत.

दादरचा बाजार तर कंदिलांनी सजला आहे.

कापडाचे, प्लॅस्टिक, कागदी कंदिलांबरोबरच धाग्यांमध्ये बांधलेले कंदील बाजाराची शोभा बाढवीत आहेत. माहिममधील कंदील गल्लीत गुरुवारीही खरेदीकरिता जत्रा भरली होती. दादरमध्ये पर्यावरणस्नेही आकाशकंदील. कागदाचे, लोकरीच्या धाग्याचे, कापडाच्या नाडीपासून बनवलेले कंदील सध्या बाजारात उठून दिसत आहेत. दादरच्या पोर्तुगीज चर्चच्या पदपथावर विक्रीसाठी असलेले ‘उत्सवी’ या संस्थेने कागदी पुठ्ठय़ापासून बनविलेल्या कंदिलांना केवळ मुंबईतून नाही तर जगभरातून मागणी वाढत आहे. गेली १६ वष्रे ‘उत्सवी’चे नानासाहेब शेंडकर गणपतीत पर्यावरणपूरक मखर बनवितात. या वर्षी पहिल्यांदाच त्यांनी सहज दुमडून ठेवता येतील अशा पाच हजार कंदिलांची निर्मिती केली आणि हातोहात त्यांची खरेदीही झाली. ‘पूर्वी पितळेचे कंदील दिवाळीत लावले जायचे. परंतु बदलत्या काळानुसार कंदीलही बदलले आणि म्हणूनच या वर्षी िहदू संस्कृतीतील काही धार्मिक चिन्हे वापरून या पुठ्ठय़ांच्या कंदिलांची निर्मिती केली आहे, असे शेंडकर यांनी ‘लोकसत्ता-मुंबई’शी बोलताना सांगितले.