तब्बल ३३ वर्षांनंतर आज प्रथमच

त्या इमारतीत सनईचे सूर घुमले. मंगलाष्टके झाली आणि अक्षतांचा खच पडला.. कांजूर गावातील ‘वात्सल्य ट्रस्ट’च्या इमारतीला आज आनंदाचे भरते आले आणि वयाच्या चौथ्या महिन्यापासून अंगाखांद्यावर खेळविलेल्या करुणाची सासरी पाठवणी करताना ती इमारतही काहीशी हळवी झाली.. दिवसभर उत्साहाने आणि एका आगळ्याच आनंदाने न्हाऊन निघालेल्या या इमारतीवर संध्याकाळी मात्र काहीसे उदासपण आले. लग्न होऊन मुलगी सासरी गेल्यानंतर घराला येतं, तसंच!..

wife does not wear saree of my choice husband created ruckus matter reached police station couple goes for divorce
पत्नी आवडीची साडी नेसत नाही; कंटाळलेल्या पतीने लग्नानंतर ८ महिन्यातच मागितला घटस्फोट
Nashik Citylink bus
परीक्षा काळातच नाशिकची सिटीलिंक बससेवा पुन्हा ठप्प
7th March After 18 Years Budh Rahu Yuti In Meen Rashi These Five Zodiac Signs Kundali 360 degree Turn Can Become Crorepati
१८ वर्षांनी बुध-राहू युती बनल्याने एका झटक्यात ‘या’ ५ राशींच्या नशिबाला मिळेल कलाटणी; तुम्हीही होणार कोट्याधीश?
Kilimanjaro climbed by youth
मूत्रपिंड प्रत्यारोपित तरुणाकडून टांझानियातील ‘किलीमांजरो’ सर, भारतातील एकमेव उदाहरण असण्याची शक्यता

गेल्या दहा-बारा दिवसांपासून ‘वात्सल्य’च्या त्या अनाथालयातील प्रत्येक जण गडबडीत होता. एखाद्या खोलीत, संध्याकाळची प्रार्थना आटोपल्यानंतर साऱ्या जणी मिळून करुणाच्या पाठवणीसोबत द्यायच्या रुखवताची तयारी करत होत्या, तर कुणी करुणाच्या लग्नासाठी मोत्याचा अंतरपाट बनविण्यात मग्न होत्या. काहींनी तर साठवलेले खाऊचे पैसे गोळा करून करुणासाठी मंगळसूत्रे आणि लग्नाच्या वेळी घालावयाचे दागिने विकत आणले होते, तर काही जणी पाहुणचाराच्या तयारीत गुंतल्या होत्या.

..आठवडाभराच्या तयारीनंतर आज वात्सल्यच्या इमारतीला पहाटेच जाग आली. या अनाथालयातील मुलींची करुणादीदी आणि मुलांची ताई आज लग्न होऊन सासरी जाणार होती. सकाळपासून संस्थेचे हितचिंतक गोळा होऊ लागले. सनईचे सूर घुमू लागले. प्रवेशद्वारावर साधीशीच, पण मोहक कमान पाहुण्यांचे स्वागत करत होती. फुलांच्या माळांनी बाजूची भिंत नटली होती आणि आत लगीनघाई सुरू झाली होती. असंख्य पाहुणे जमा झाले होते. त्यापैकी किती तरी जण एकमेकांना ओळखतदेखील नव्हते. तरीही गर्दीत आपोआपच कौटुंबिक नात्याची वीण तयार झाली आणि आपल्या घरचेच लग्न असल्याची सहज भावना लग्नघरात तयार झाली. साडेबाराच्या मुहूर्ताच्या वेळेपर्यंत वात्सल्यचे सभागृह, बाहेरचे अंगण आणि परिसर, हाती अक्षता घेऊन ‘शुभमंगल सावधान’चे शब्द कानात साठविण्यासाठी आतुरला होता.

‘वात्सल्य ट्रस्ट’चे संस्थापक दामलेकाका, संजीवनी रायकर, संस्थेच्या कामात सहभागी असणारे असंख्य हितचिंतक, संस्थेच्या सानपाडा वृद्धाश्रमातील अनेक वयोवृद्ध आजोबा, अनाथालयातील करुणाची सारी भावंडे, आया आणि कर्मचारी एका आगळ्याच आनंदात होते. १९८३ साली अनाथालय म्हणून स्थापन झालेल्या ‘वात्सल्य’चा पसारा आता प्रचंड वाढला आहे. वृद्धाश्रम, अनाथालय, मुलींना परिचारिकेचे शिक्षण देणारे केंद्र, अभावग्रस्त मुलांच्या पुनर्वसनाचे आणि प्रशिक्षणाचे केंद्र आणि अनेक उपक्रमांचा डोलारा हसतमुखाने आणि स्वेच्छेने अंगावर पेलणारे नागनाथ सराफकाका तर पहाटेच दाखल झाले होते. अनाथालयात दाखल झालेल्या चार महिन्यांच्या लहानगीला हातावर घेऊन झोका देत सराफकाकांनीच तिचे नामकरण केले होते. तेव्हापासून करुणा ही ‘वात्सल्यची मुलगी’ झाली. साहजिकच, करुणाचे कन्यादानही सराफकाकांनीच करावे, असे संस्थेच्या सर्वानीच ठरविले आणि मुहूर्ताच्या क्षणापर्यंत हसतमुखाने वावरत सर्वाचे स्वागत करणारे सराफकाका करुणाला बोहल्यावर चढविताना काहीसे हळवे झाले.. क्षणभर मान वळवून त्यांनी पाणावलेले डोळे पुसले आणि मंगलाष्टक सुरू होण्याआधीच तळव्यावरच्या अक्षता करुणाच्या डोक्यावर टाकल्या..

गेल्या तेहतीस वर्षांत वात्सल्यच्या हितचिंतकांचा एक परिवार तयार झाला आहे. आज करुणाच्या लग्नाच्या निमित्ताने, या परिवाराचे आगळे स्नेहसंमेलन झाले.. दुपारी जेवणे आटोपली, तोवर करुणाच्या पाठवणीच्या जाणिवा उमटू लागल्या.. संध्याकाळी करुणाला सासरी पोहोचविताना पुन्हा सराफकाकांचे डोळे पाणावले.

आजवर हजारो अनाथ मुलांचे भविष्य आश्वस्त करणाऱ्या ‘वात्सल्य’ने आज त्यांच्या परिवाराच्या एका मुलीचे ‘शुभमंगल’ घडविले.. ‘एका लग्नाची पहिली आणि आगळीवेगळी गोष्ट’ त्या अनाथालयाने अनुभवली!