शनिवारची मध्यरात्र.. काळबादेवीतील जुन्या हनुमान गल्लीच्या बाहेर पोलीस, अग्निशमन दल अधिकारी-कर्मचारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि बघ्याची प्रचंड गर्दी उसळली होती. त्या गर्दीत वाट काढत एक मुलगा पुढे आला आणि अग्निशमन दलाच्या जवानांना विचारू लागला, ‘काका, माझे बाबा कुठे आहेत, त्यांना कुणी पाहिले का, त्यांना नक्की काय झाले आहे, मला कुणी सांगाल का?’ त्याच्या प्रश्नांची उत्तरे देण्याच्या मन:स्थितीत कुणीच नव्हते. एक अधिकारी धीर करून म्हणाला, ‘आताच कुणाला तरी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात घेऊन गेले, तिथे जाऊन पाहा.’ हे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच तो मुलगा रुग्णवाहिकेच्या मागे धावत गेला. तो होता सहायक विभागीय अधिकारी संजय वामन राणे यांचा चिरंजीव राज.
काळबादेवी येथील जुन्या हनुमान गल्लीमधील ‘गोकुळ हाऊस’ इमारतीला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलातील सहायक विभागीय अधिकारी संजय राणे  गेले होते. आग आटोक्यात आल्यानंतर काही अधिकारी पाहणी करण्यासाठी इमारतीच्या आत गेले आणि इमारत कोसळली. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने मुंबईभर पसरली आणि अग्निशमन दलाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. ढिगाऱ्याखाली सापडलेल्या अधिकाऱ्यांची नावे वृत्तवाहिन्यांवर झळकू लागल्यानंतर आपली व्यक्ती नेमकी कुठे आहे याचा ठाव घेण्यासाठी नातेवाईकांची धडपड सुरू झाली. आपले वडील  कुठे आहेत याचा शोध घेत संजय राणे यांचा पुत्र राज शनिवारी मध्यरात्री गर्दीतून मार्ग काढत आपल्या मित्रासह हनुमान गल्लीच्या नाक्यावर पोहोचला.

अधिकारीही हबकले
इमारतीला लागलेली आग, कोसळणाऱ्या इमारतीखाली अडकलेले अधिकारी यामुळे अग्निशमन दलाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचले होते.  एक तणाव सर्वाच्याच चेहऱ्यावर दिसत होता. पण ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी त्यांची तळमळ सुरू होती. अधिकारी-कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू असतानाच राज तेथे पोहोचला. गर्दीमध्ये त्याला वडिलांचे मित्र दिसले. ‘माझे बाबा दिसले का, ते कुठे आहेत सांगा, त्यांना काही झालेले नाही ना,’ अशी विचारणा राज त्यांच्याकडे करू लागला. संजय राणे यांचा पुत्र आपल्यासमोर उभा पाहून या अधिकाऱ्याला काय बोलावे हे सुचतच नव्हते. पण राज पुन्हा पुन्हा बाबांची चौकशी करीत होता. तेवढय़ात जुन्या हनुमान गल्लीतून एक रुग्णावाहिका रुग्णालयाच्या दिशेने निघून गेली. ‘आताच कुणाला तरी रुग्णालयात घेऊन गेले आहेत. पाहा कदाचित त्यांना रुग्णालयात नेले असेल,’ असे या अधिकाऱ्याने राजला सांगितले. अधिकाऱ्याचे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच राज रुग्णवाहिकेच्या मागे पळत गेला. आपल्या सहकाऱ्याच्या मुलाची अवस्था पाहून हा अधिकारी अधिकच गलबलून गेला.

ही बातमी वाऱ्याच्या वेगाने मुंबईभर पसरली आणि अग्निशमन दलाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. ढिगाऱ्याखाली सापडलेल्या अधिकाऱ्यांची नावे वृत्तवाहिन्यांवर झळकू लागल्यानंतर आपली व्यक्ती नेमकी कुठे आहे याचा ठाव घेण्यासाठी नातेवाईकांची धडपड सुरू झाली..