ज्येष्ठ अभिनेत्री व तृणमुल काँग्रेसच्या खासदार मूनमून सेन आणि त्यांचे कुटुंबीय घराला लागलेल्या आगीतून बचावले. शनिवारी रात्री जुहू येथील त्यांच्या इमारतीच्या फ्लॅटला एसीचा स्फोट होऊन ही आग लागली. आगीत कुणीच जखमी झाले नसले तरी संपूर्ण घर जळाले आहे. मूनमून सेन पती, मुलगी रिया सेन यांच्यासह जुहूच्या रुईया पार्क इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राहतात. रात्री दीडच्या सुमारास अचानक घरातील एसीचा स्फोट झाला आणि घरात आग लागली. त्या वेळी घरात मूनमून सेन, त्यांचे पती, रिया सेन तसेच दोन मोलकरणी होत्या. एसीच्या वायरिंगमधून ठिणग्या उडून स्फोट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमन दल उशिरा पोहोचल्याचा आरोप अभिनेत्री रिया सेनने केला आहे.