राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाची कारवाई; महाविद्यालयांना खुलासा करण्याचे आदेश

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाने नियमबाहय़रीतीने गणित विषय घेऊन बारावीची परीक्षा देणाऱ्या मुंबईतील २९९ विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. दहावीला सामान्य गणित घेऊन पास झालेल्या या विद्यार्थ्यांना बारावीला गणित विषय घेऊन परीक्षा देता येत नाही. असे असताना यांना प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांनी योग्य वेळेत खुलासा न केल्यास या विद्यार्थ्यांचा बारावीचा निकाल राखून ठेवण्यात येणार आहेत. महाविद्यालयांच्या निष्काळजीपणामुळे मात्र मुंबईतील विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

दहावीच्या परीक्षेत गणिताचा बागुलबुवा वाटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य गणित हा पयार्यी विषय शासनाने उपलब्ध करू दिला. हा विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र बारावीचे काठिण्य पातळीचे गणित जमणे शक्य नाही. तेव्हा अशा विद्यार्थ्यांना बारावीला गणित विषय अभ्यासाला घेण्यास मज्जाव करण्यात आला. मंडळाच्या नोटीसमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची कोणतीही चूक नसल्यामुळे त्यांचे निकाल राखून ठेवून नयेत, अशा विनंतीचे पत्र शिक्षक परिषदेचे अनिल बोरनाने यांनी राज्य उच्च व माध्यमिक शिक्षण मंडळाला पाठविले आहे. नियमबाह्य़रीतीने गणित विषय घेऊन बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणारी महाविद्यालये या प्रकाराला जबाबदार आहेत.

या प्रकरणाची सविस्तर माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे पाठविण्यात आली आहे. मंडळाने घेतलेल्या निणर्यानुसार विद्यार्थ्यांच्या निकालबाबत अंमलबजावणी केली जाईल, असे मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

२९९  विद्याथ्र्यी नियमबाह्य़

मुंबईमधील २९९ विद्यार्थ्यांनी नियमबाह्य़ रीतीने बारावीला गणित विषयाची परीक्षा दिली असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाने उघडकीस आणले आहे. सामान्य गणित विषय घेऊन दहावी पास झालेल्या या विद्यार्थ्यांना गणित विषय अभ्यासण्याची परवानगी नसतानाही नियमबाह्य़ प्रवेश देणाऱ्या मुंबईमधील सुमारे १५० महाविद्यालयांना मंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबतचा खुलासा महाविद्यालयांनी वेळेत मंडळाकडे न केल्यास या विद्यार्थ्यांचे बारावीचे निकाल राखून ठेवले जाणार आहेत.