मुंबई विभागातील देखभाल-दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह

‘माथेरानच्या राणी’साठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सहा कोटींची रक्कम मंजूर केली असताना काही महिन्यांपूर्वी या ‘राणी’च्या सेवेत असलेले आणि नंतर दार्जिलिंग येथील छोटय़ा गाडीच्या सेवेत गेलेले इंजिन घसरल्याचे समोर आले आहे. मंगळवारी दार्जिलिंग येथील छोटय़ा गाडीचे इंजिन आणि दोन डबे घसरल्याची घटना घडली. हे घसरलेले इंजिन माथेराहून दार्जिलिंगला पाठवण्यात आले होते. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांमध्ये देशभरात गाडय़ा घसरण्याच्या घटनेत मुंबईशी थेट संबंध असलेली ही दुसरी घटना आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात माथेरान ते अमन लॉज यादरम्यान ‘माथेरानची राणी’ एकाच आठवडय़ात दोन वेळा घसरली होती. त्यानंतर तत्कालीन महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी ही गाडी सुरक्षेच्या कारणास्तव काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

या निर्णयानंतर ही गाडी अद्याप चालविण्यात आलेली नाही. या गाडीच्या इंजिनांमध्ये एअरब्रेक नसल्याने ती धोकादायक असल्याचे सांगण्यात आले होते. हे एअरब्रेक बसवण्यासाठी ही इंजिने दार्जिलिंगला पाठवण्यात आली होती. त्यापैकी एक इंजिन मंगळवारी दार्जिलिंग येथे रुळांवरून घसरून अपघात झाला.

या अपघातामागे रुळांची वाईट परिस्थिती, डब्यांमधील बिघाड, इंजिनातील बिघाड यांपैकी कोणते कारण आहे, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पण मध्य रेल्वेने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबई विभागातील यांत्रिक विभागातील अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

  • काही दिवसांपूर्वी कानपूर येथे गाडी घसरून झालेल्या अपघाताच्या वेळीही या गाडीच्या डब्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ येथील कारखान्याकडे असल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी या कारखान्याच्या व्यवस्थापकांची नुकतीच तडकाफडकी बदलीदेखील करण्यात आली.
  • आता दार्जिलिंग येथे झालेल्या अपघाताचा संबंधही मुंबईच्या मध्य रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीच्या कार्यप्रणालीशी येत असल्याने मुंबईतील देखभाल-दुरुस्तीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.