डोंगररांगांच्या कुशीतून माथेरान नावाच्या स्वर्गात अलगद घेऊन जाणाऱ्या माथेरान लाइट रेल्वेचे (एमएलआर) एक शंभर वर्षे जुने इंजिन गेली तीस वर्षे इंग्लंडच्या एका वस्तुसंग्रहालयात पडून आहे. आता या वस्तुसंग्रहालयाने भारतीय रेल्वेचा हा अमूल्य ठेवा विक्रीला काढला आहे. १९०७ साली जर्मनीत तयार झालेले हे इंजिन रेल्वे मंत्रालय आणि भारत सरकार यांनी पुन्हा मायदेशी आणण्याचा प्रयत्न करावा, अशी इच्छा माथेरान लाइट रेल्वे बांधणाऱ्या पीरभॉय कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. हे इंजिन नव्याने खरेदी करणाऱ्याने ते चालू स्थितीत ठेवायला हवे, ही अट वस्तुसंग्रहालयाने घातली आहे. ओरिएनश्टाइन अ‍ॅण्ड कॉप्पेल या जर्मनीतील कंपनीने खास डोंगराळ भागांतील रेल्वेमार्गासाठी तयार केलेल्या इंजिनांपैकी चार इंजिने सर आदमजी पीरभॉय यांनी खरेदी केली होती. एमएलआर-७३८, एमएलआर-७३९, एमएलआर-७४० आणि एमएलआर-७४१ अशी ही चार इंजिने १९०७ मध्येच माथेरान लाइट रेल्वेच्या सेवेत आली. १९.९७ किलोमीटरच्या नेरळ ते माथेरान या रेल्वेमार्गाची बांधणीही सर आदमजी पीरभॉय यांनी कौटुंबिक मालमत्तेतूनच केली होती. या चार इंजिनांपैकी एमएलआर-७४० हे इंजिन सध्या इंग्लंडमध्ये आहे. १९०७ पासून १९६५पर्यंत ही इंजिने माथेरान लाइट रेल्वेच्या सेवेत होती. त्यानंतर ही इंजिने काही दिवस नेरळ येथेच ठेवण्यात आली होती. १९८२ पर्यंत ही इंजिने वापरात होती. त्यानंतर २८ नोव्हेंबर १९८६ रोजी एमएलआर-७४० हे इंजिन इंग्लंडमधील अ‍ॅम्बर्ले चॉक पीट्स या वस्तुसंग्रहालयाला भारतीय रेल्वेने भेट म्हणून दिले. या वस्तुसंग्रहालयाने पीटर्सबर्ग येथील रेलवर्ल्ड वस्तुसंग्रहालयाला हे इंजिन १९९१मध्ये दान केले. या वस्तुसंग्रहालयाने हे इंजिन आता विकण्यास काढले आहे. माथेरान रेल्वे सुरू करणारे सर आदमजी पीरभॉय यांच्या कुटुंबियांना ही गोष्ट कळल्यानंतर हे इंजिन पुन्हा भारतातच आणले जावे, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. ही रेल्वे म्हणजे आमच्या कुटुंबाची निर्मिती आहे. हे इंजिन म्हणजे भारतीय रेल्वेचाही एक मौल्यवान ठेवा आहे. त्यामुळे सर आदमजी पीरभॉय यांचा सन्मान करण्यासाठी सरकारने हे मूळ इंजिन पुन्हा भारतात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे या कुटुंबातील तिसऱ्या पिढीच्या अली अकबर आदमजी पीरभॉय यांनी सांगितले.