माथेरानची मिनी गाडी बंद करण्याच्या निर्णयाला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ब्रेक दिल्यानंतर काहीही करून जूनच्या पहिल्या आठवडय़ात तरी ही माथेरानची मिनी गाडी चालवण्यासाठी रेल्वेचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. सध्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारी चाचणी शिल्लक असून लवकरच चाचणी पूर्ण करून जूनच्या पहिल्या आठवडय़ात तरी ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. मात्र त्यानंतर पावसाळा सुरू होताच १५ जूननंतर ही सेवा तात्पुरत्या कालावधीसाठी बंद केली जाणार आहे. त्यामुळे जून महिन्यातील माथेरान ट्रेनचा ‘मिनी’ प्रवास तेवढा शिल्लक राहिल्याचे पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी माथेरानची मिनी ट्रेन बंद करण्याचा निर्णय मागे घेत अमन लॉज ते माथेरानपर्यंत सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला. याच धर्तीवर मध्य रेल्वेने ही सेवा जूनपासून सुरू करण्याच्या दृष्टीने चाचण्या घेतल्या आहेत. मात्र चाचण्या घेतल्यानंतर ही सेवा तातडीने सुरू करणे अशक्य आहे. कारण नियमानुसार जोपर्यंत रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून जातीने स्वत: चाचणी घेतली जाणार नाही. तोपर्यंत ही सेवा सुरू होणार नसल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. ही परवानगी मिळेपर्यंत किमान जूनच्या पहिला आठवडा उजाडेल.