रेल्वे महाव्यवस्थापक ३१ मेपर्यंत चाचणी घेणार
नेरळहून माथेरानला जाणारी रेल्वे पूर्णपणे बंद करण्याच्या तयारीत असलेल्या मध्य रेल्वेने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या आदेशानंतर ही गाडी चालू ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. तांत्रिक अडचणींमुळे आणि प्रवासी सुरक्षा लक्षात घेऊन सध्या ही सेवा माथेरान-अमन लॉज यांदरम्यान चालवली जाणार आहे. ही सेवा जूनपासून सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि रेल्वे सुरक्षा आयुक्त ३१ मेपर्यंत या गाडीची चाचणी घेणार आहेत. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे समाधान झाल्यास जूनच्या पहिल्या आठवडय़ात या मार्गावरील सेवा सुरू होईल.
माथेरान-अमन लॉज यांदरम्यान एकाच आठवडय़ात दोन वेळा रेल्वे रुळांवरून घसरल्यानंतर मध्य रेल्वेने प्रवासी सुरक्षेचे कारण पुढे करत ही गाडी बंद केली. त्यानंतर माथेरान व नेरळ येथील स्थानिकांबरोबरच पर्यटक आणि विविध स्तरांतील लोकांनी रेल्वेच्या या निर्णयावर टीका करत ही सेवा चालू ठेवण्यासाठी थेट रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचीही भेट घेतली. सुरेश प्रभू यांनी मध्य रेल्वेला आदेश देत ही सेवा बंद न करता चालूच ठेवण्याच्या सूचना केल्या. या सूचनांनुसार आता माथेरान ते अमन लॉज यांदरम्यान तरी ही सेवा चालू ठेवण्याचा विचार रेल्वेने केला आहे. त्यासाठी रेल्वेने दोन इंजिन आणि दहा डबे अशी तरतूद केली आहे. या इंजिनांना एअर ब्रेकची सुविधा असावी, अशी सूचना रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी २०११-१२ या वर्षांत केली होती. मात्र इंजिनाची क्षमता फक्त ३०० अश्वशक्ती एवढी असल्याने त्या वेळी शक्य झाले नाही. आता या दोन्ही इंजिनांमध्ये आणखी ३०० अश्वशक्तीची क्षमता देण्यात आली असून एअर ब्रेक लावणे शक्य होणार आहे, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी सांगितले.

पाच-सहा चाचणी फेऱ्या
माथेरान ते अमन लॉज यांदरम्यान ६०० मीटरच्या अंतरात संरक्षक भिंत उभारणे आवश्यक आहे. मात्र पर्यावरणाचा घटक लक्षात घेता त्याला परवानगी मिळणार नाही. त्यामुळे आता थोडय़ा थोडय़ा अंतरावर खांब उभारण्यात येणार आहेत. ही गाडी नेरळपर्यंत चालवायची असेल, तर या २१ किलोमीटरपैकी तीन किलोमीटर अंतरात असे खांब उभारावे लागणार असल्याचेही ब्रिगेडिअर सूद यांनी सांगितले. आता ३१ मेपर्यंत शक्य झाल्यास रेल्वे सुरक्षा आयुक्तांसह एक दिवस या गाडीच्या पाच-सहा चाचणी फेऱ्या घेण्यात येणार आहेत.