गेल्या अनेक वर्षांपासून वडाळ्यातील उषा सोसायटीत एकाकी राहाणाऱ्या ललिता सुब्रमण्यम या ८३ वर्षांच्या वृद्धेचा वाढदिवस सोमवारी माटुंगा पोलिसांनी मोठय़ा थाटामाटात साजरा केला. मुले परदेशात असल्याने जवळ कोणीच नाही. मधल्या काळात ललिता यांच्या आयुष्यातील ही उणीव माटुंगा पोलिसांनी भरून काढली. माटुंगा पोलीस ललिता यांना ‘मम्मी’ म्हणूनच हाक मारतात. काहीही लागले, गरज भासली किंवा अगदी वेळ जात नाही असे वाटले, तरी ललिता माटुंगा पोलिसांना हक्काने हाक मारतात. पोलीसही त्यांच्या हाकेला धावून जातात. याच मायेतून गेल्या वर्षी माटुंगा पोलिसांनी आपल्या ‘मम्मी’चा पहिला वाढदिवस साजरा केला. आपल्या व्यग्र कामातून ‘मम्मी’चा वाढदिवस लक्षात ठेवीत माटुंगा पोलिसांनी याही वर्षी ललिता यांचा वाढदिवस साजरा केला.

सोमवारी दुपारी पोलीस प्रवक्ते अशोक दुधे, माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब काकड आणि अन्य अधिकारी, कर्मचारी उषा सोसायटीत केक घेऊन धडकले. दरवाजा उघडताच वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पोलिसांनी ललिता यांना थक्क केले. ललिता यांचा पोलिसांसह पहिला वाढदिवस साजरा झाला तेव्हा दुधे परिमंडळ-४ चे उपायुक्त होते.

ललिता यांना तीन मुले आहेत. त्यापैकी दोघे कामानिमित्त परदेशात आहेत. तर एक बेंगळुरूमध्ये स्थायिक आहे. तिघांनी ललिता यांना आपल्या घरी नेले. पण तेथील वातावरणाशी न जुळल्यामुळे ललिता पुन्हा मुंबईत परतल्या. तेव्हापासून माटुंगा पोलीस ठाण्यातल्या अधिकारी व कर्मचारी यांनीच ललिता यांची काळजी घेतली. वयोमानानुसार ललिता यांना विचित्र आजार जडला आहे. मध्येच त्यांची वाचा जाते. अशा वेळेस त्या मोबाइलमध्ये नंबर ‘सेव्ह’ असलेल्या कोणाही पोलीस अधिकाऱ्याला फोन करतात आणि देव्हाऱ्यातली घंटा वाजवतात. ते ऐकून ललिता यांना मदतीची गरज आहे, हा संकेत मिळतो, असे उपायुक्त दुधे यांनी सांगितले.