प्रथमच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष; दक्षिण मुंबईत सर्वाधिक मुले
आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील सिग्नल बालकामगारांचे अड्डे झाल्याचे दिसून येत आहे. शहराच्या दक्षिण भागातच या मुलांचे प्रमाण सर्वाधिक दिसत असून विविध वस्तूंची विक्री आणि भीक मागणे या कामात मुलांना गुंतवण्यात येत असल्याचे निष्कर्ष प्रथम या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही सर्व कामे करणारी ८४ टक्के मुले त्यांच्या कुटुंबासोबत राहात असल्याचे उघड झाले आहे.
शहरातील सिग्नल, रेल्वे स्थानके आणि पर्यटनस्थळांच्या आसपास असणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण प्रथम या संस्थेतर्फे करण्यात आला असून यात ६५१ मुलांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यात उघडय़ावर राहणारी मुले कोणासोबत राहतात, काय कामे करतात याविषयी माहिती घेण्यात आली. यात सर्वाधिक मुले ६ ते १४ या वयोगटातील दिसून आली त्यातील तब्बल ४७ टक्के मुले सिग्नलवर आढळून आली असून ही विविध वस्तूंची विक्री करणे, भीक मागणे अशी कामे या मुलांकडून करवून घेण्यात येत असल्याचेही धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. सर्वेक्षणात या मुलांमधील ८४ टक्के मुले ही आपल्या आईवडिलांसोबत राहात असल्याची माहिती त्यांनी दिल्याचे प्रथमचे प्रकल्प संचालक किशोर भामरे यांनी दिली. पालकच मुलांना या व्यवसायात ढकलत असल्याचे वरकरणी दिसत असले तरीही नेमकी ही मुले त्यांचीच आहेत का, त्यांचा सांभाळ कशा प्रकारे होतो याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बालकामगारांची संख्या केवळ झोपडपट्टय़ांमध्ये असलेल्या कारखान्यांमध्ये असल्याची आपली समजूत आहे. पण आपल्या डोळ्यांसमोर अनेक बालकामगार असूनही त्याबद्दल सरकार आणि जनताही कमालीची उदासीन असल्याचेच यातून स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. सर्वेक्षण हे प्रातिनिधिक चित्र उभे करणारे असले तरी दक्षिण मुंबईत अनेक सरकारी संस्था, आयुक्त कार्यालय, पोलीस मुख्यालय, मंत्रालय असूनही या विषयाकडे दुर्लक्ष होते, ही शोकांतिका आहे, असे मत प्रथमच्या संस्थापक विश्वस्त फरिदा लांबे यांनी व्यक्त केले.

सर्वेक्षणातील निष्कर्ष
१. एकूण मुले – ६५१. मुले – ३४२, मुली ३०९
२. वयोगटानुसार मुलांची विभागणी १-२ वर्षे – ७० (११टक्के), ३-५ वर्षे -१५९ (२४ टक्के), ६ -१४ वर्षे – ३७७ (५८टक्के), १५-१८ वर्षे – ४५ (७टक्के)
३. ठिकाणानुसार विभागणी सिग्नल – ३०६ (४७ टक्के), रेल्वे फलाट – १९१ (२९ टक्के), पर्यटन स्थळे – १५४ (२४टक्के)
४. मुलांचे व्यवसाय – फेरीवाले, वस्तू विक्री – ३१८ (४९टक्के), भीक मागणे – ३०९ (४७ टक्के), भटकणे – २१ (३ टक्के), अमली पदार्थाचे सेवन – ३ (१टक्के)