नवी मुंबई महानगरपालिकेतील वाद विकोपाला गेल्याचे दिसत आहे. मंगळवारी सकाळी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात १०५ विरूद्ध ६ मतांनी अविश्वास ठराव संमत झाल्यानंतरही तणावाचे वातावरण कायम आहे. एकीकडे महापौरांनी आपल्याला बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याची खंत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केली तर दुसरीकडे महापौरांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तुकाराम मुंढेंना महापालिकेत येण्यास मज्जाव करण्याची मागणी केली. त्यामुळे आयुक्त विरूद्ध महापालिका पदाधिकारी वादाने नवे वळण घेतले आहे.
मंगळवारी तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल होण्यापूर्वी महापालिका परिसरात मुंढे समर्थक नागरिक व विरोधक मोठ्याप्रमाणावर आले होते. मुंढे हे पुन्हा महापालिकेत आल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी भीती महापौर सोनावणे यांनी पोलिसांसमोर व्यक्त केली. त्यांना महापालिकेत येण्यास मज्जाव करा अशी मागणी त्यांनी केली. मुंढेंना महापालिकेत येण्यापासून रोखण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र आले आहेत.
दरम्यान, महापौर सोनावणे यांनी मुख्यमंत्र्यांनी आयुक्त मुंढेंना त्वरीत बोलवावे व प्रतिनियुक्तीवर दुसरे आयुक्त देण्याची मागणी केली आहे. तत्पूर्वी आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या विशेष सभेत १०५ विरूद्ध ६ मतांनी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.
तत्पूर्वी, जोपर्यंत शासन बदली करत नाही. तोपर्यंत मी पदावर कायम आहे. त्यामुळे माझे काम पूर्वीप्रमाणेच चालू राहील. यापूर्वीही मी कायद्याच्या चौकटीतच काम केले. यापुढेही तसेच काम करणार असल्याची ग्वाही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. त्यामुळे धाबे दणाणलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी पुन्हा एकदा आपली एकजूट दाखवल्याचे सांगितले जाते.