मानवी जीवनाचा, त्यांच्या स्वभाववैशिष्टय़ांचा आपल्या साहित्यकृतीतून वेध घेणारे सृजनशील नाटककार व साहित्यिक विजय तेंडुलकर यांच्या ‘वासनाचक्र’, ‘तुघलक’, ‘मुखवटे’ आणि ‘मी कुमार’ या अनुवादीत नाटकांपैकी १९८० साली अनुवादीत केलेले ‘मी कुमार’ या नाटकाचे त्याकाळी पाच प्रयोग झाले, मात्र त्यानंतर आजतागायत कित्येकांना तेंडुलकरांच्या ‘मी कुमार’ या अनुवादीत नाटकाबद्दल पुरेशी माहिती नसल्याने हे नाटक विस्मरणात गेले होते. परंतू आता या नाटकाची संहिता पुस्तकाच्या रुपाने वाचकांच्या भेटीला येत आहे. नाटय़दिग्दर्शक विजय केंकरे यांनी ही नाटय़संहिता प्रकाशित करण्यासाठीचे प्रयत्न केल्यामुळे ‘पॉप्युलर प्रकाशन’तर्फे या पुस्तकाचे प्रकाशन १४ फेब्रुवारी रोजी ‘काळा घोडा महोत्सवा’त करण्यात येणार असल्याचे पॉप्युलर प्रकाशनाच्या अस्मिता मोहिते यांनी सांगितले.
गुजराती लेखक नाटककार मधु राय यांचे ‘कुमारनी आगाशी’ हे गुजरातीतील एक महत्त्वाचे नाटक असून याचा हिंदी अनुवाद इस्मत चुगताईंनी ‘नीला कमरा’ नावाने केला होता. तर १९८० साली ‘मी कुमार’ या नावाने तेंडुलकरांनी या नाटकाचा अनुवाद केला असून ‘इंडियन नॅशनल थिएटर’ने याचे पाच प्रयोगही सादर केले होते. सदाशिव अमरापूरकर यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते. गुजराती व हिंदीमध्ये प्रेक्षकांनी उचलून धरलेल्या या नाटकामध्ये उच्च मध्यमवर्गीय कुटुंब व जवळच्या नातेसंबंधाविषयी भाष्य केले आहे. त्यांचे आपापसातीले तणाव-वाद, रहस्यमय रचनेचा आधार घेत मांडले आहे. त्यामुळे नाटकात पुढे काय घडणार? याची उत्सुकता लागून राहते. प्रत्येकाचे एक कल्पनेतील विश्व असते व आपण ते अंतराअंतराने जगावे असे प्रत्येकाला वाटत असते, या मुद्दय़ाभोवती नाटकातील पात्र उलगडत जातात. या नाटकामधील रहस्यमयता प्रेक्षकांना खिळवून ठेवते. या नाटकात कुमार या पात्राच्या मृत्युचा शोध घेतला जात आहे, मात्र हा शोध केवळ कुमारच्या मृत्यूपुरता सीमित नसून हा शोध सुखवस्तु कुटुंबातील नातेसंबंधाचा, स्त्री-पुरुष संबंधाचा आहे. नाटक अनुवादीत असले तरी नाटकातील अनेक प्रसंगांमध्ये तरुण मुलांची स्त्रीकडे बघण्याची मानसिकता तेंडुलकरांनी कसलाही आडपडदा न ठेवता, धीटपणे दाखवली आहे. या नाटकामध्ये छोटय़ा संवादाबरोबरच स्वगतांचाही वापर केला आहे. तेंडुलकरांच्या चाहत्यांना व नाटय़कर्मीना चांगली संहिता पुस्तकरुपाने वाचता येणार आहे.
१९८० साली ‘मी कुमार’ हे नाटक सदाशिव अमरापूरकरांनी दिग्दर्शित केले असल्याचे माझ्या स्मरणात होते. ‘कुमारनी आगाशी’ हे गुजराती व हिंदीमध्ये गाजलेले व तेंडुलकरांनी अनुवादीत केलेले नाटक पुन्हा रंगमंचावर येण्याच्या उद्देशाने ‘मी कुमार’चा शोध सुरु केला.३० ते ३५ वर्षांनी प्रकाशित होणाऱ्या ‘मी कुमार’च्या नाटय़संहितेबरोबरच नाटकाच्या प्रयोगाचाही प्रेक्षकांना आस्वाद घेता यावा अशी इच्छा आहे.
विजय केंकरे, नाटय़दिग्दर्शक