वैद्यकीय अध्यापकांचे निवृत्तीचे वय ६२ वरून ७० वर्षे करण्याबाबत विचार करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच राज्य सरकारला दिले. भारतीय वैद्यक परिषदेने काढलेल्या अधिसूचनेनुसार वैद्यकीय अध्यापकांचे निवृत्तीचे वय ७० वर्षे करण्यात आलेले आहे. परंतु राज्यातील अध्यापकांचे वय अद्याप ६२ वर्षेच आहे.
पीपल्स हेल्थ ऑर्गनायझेशन (इंडिया)च्या वतीने डॉ. आय. एस. गिल्डा यांनी केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळेस न्यायालयाने राज्यातील वैद्यकीय अध्यापकांचे निवृत्तीवय ७० वर्षे करण्याबाबत राज्य सरकारला निर्देश दिले. भारतीय वैद्यक परिषदेने निवृत्तीवय वाढविण्याबाबत काढलेल्या अधिसूचनेची प्रत याचिकेवर उत्तरादाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रासह न्यायालयात सादर करण्यात आली. भारतीय वैद्यक परिषदेच्या निर्णयाच्या पाश्र्वभूमीवरच राज्यातील वैद्यकीय अध्यापकांच्या निवृत्तीचे वय ७० वर्षे करण्याबाबत विचार करावा आणि त्यादृष्टीने आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले.
दरम्यान, शिक्षणसंस्थामध्ये मराठा आणि मुस्लिमांना दिलेल्या आरक्षणालाही याचिकाकर्त्यांनी विरोध केला आहे. घटनादत्त आरक्षणाला आपला विरोध नाही. परंतु घटनात्मक आणि अतिरिक्त घटनात्मक आरक्षणामुळे खुल्या वर्गातील जागा निर्धारित होणार आहेत आणि त्याचा फटका खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना बसणार असल्याचेही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला दाखवून दिले. त्यावर न्यायालयाने याचिकेत दुरुस्ती करण्याची सूचना याचिकाकर्त्यांना केली.