सर्व औषध दुकानांमध्ये फार्मासिस्ट असलाच पाहिजे, या अन्न व औषध प्रशासनाच्या आग्रहामुळे उद्भवणाऱ्या व्यावहारिक अडचणींवर तोडगा काढण्याचे आश्वासन सरकारने पाळले नसल्याने गुरुवारपासून (ता. २१) सायंकाळी सहानंतर औषधांची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय ‘महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन’ने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे ४५ हजार औषध दुकाने सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेतच सुरू राहतील. त्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होणार आहेत.
सर्व औषध दुकानांमध्ये फार्मासिस्ट असलाच पाहिजे या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यास अन्न व औषध प्रशासनाने सुरुवात केली आहे. फार्मासिस्ट असला पाहिजे हा आग्रह मान्य आहे, पण त्यातील व्यावहारिक अडचणींकडेही लक्ष दिले पाहिजे. राज्यात किरकोळ औषध विक्रीचे ७५ हजार परवाने दिले गेले आहेत. औषधांची दुकाने दिवसभरात १२ ते १४ तास सुरू ठेवली जातात. एक फार्मासिस्ट आठ तास काम करेल असे लक्षात घेतले तर दिवसभरासाठी दोन फार्मासिस्ट ठेवावे लागतील, पण राज्यात नोंदणीकृत फार्मासिस्टची संख्या एक लाख ३५ हजार आहेत. म्हणजेच फार्मासिस्टची संख्या पुरेशी नाही, असे ‘महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन’चे कोषाध्यक्ष वैजनाथ जागुष्टे यांनी सांगितले.
हे आंदोलन फार्मासिस्टच्या नियुक्तीच्या आग्रहाविरोधात नाही, तर औषध दुकानदारांच्या व्यावहारिक अडचणी लक्षात घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन सरकारने पाळलेले नाही. डॉक्टरांकडील औषधांची विक्री रोखा, बदली फार्मासिस्ट नेमण्याबाबत संघटनेने दिलेल्या उपायाबाबत कार्यवाही करा, किरकोळ आजारांसाठी कोणती औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीविना विकता येतील याची यादी जाहीर करा, या मागण्यांसाठी हे आंदोलन आहे, असे जागुष्टे म्हणाले.

विक्रेत्यांमध्ये फूट
औषधांची दुकाने सायंकाळी सहानंतर बंद ठेवण्याच्या आंदोलनात सहभागी न होण्याचा निर्णय ‘महाराष्ट्र फार्मासिस्ट वेल्फेअर असोसिएशन’ने जाहीर केला आहे. रुग्णांचे हाल करण्याऐवजी रुग्णसेवा करण्याच्या दृष्टिकोनातून औषध विक्रेत्यांनी या आंदोलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे औषध विक्रेत्यांमध्ये आंदोलनावरून फूट पडल्याचे चित्र आहे.