लीना मोगरे यांच्याशी संवाद साधण्याची संधी

तरुण वयातच अनेकांना स्थूलपणा, मधुमेह, रक्तदाब, कोलेस्टेरॉल असे त्रास जाणवू लागतात. केवळ व्यायामाबद्दलच नाही तर लाइफस्टाइल मॅनेजमेंटबाबत लीना मोगरे यांच्याकडून जाणून घेता येईल. लोकसत्ता ‘व्हिवा लाउंज’ कार्यक्रमात शुक्रवारी लीना मोगरे यांच्याशी संवाद साधता येणार आहे. सेलिब्रिटी फिटनेस गुरू म्हणून त्यांचे अनुभवदेखील या संवादातून उलगडतील.
माधुरी दीक्षित, जॉन अब्राहम, बिपाशा बसू, कतरिना कैफ, कंगना रनौट अशा अनेक सेलिब्रिटींना लीना मोगरे यांनी फिटनेसचे धडे दिले आहेत. स्त्रियांच्या फिटनेस आणि व्यायामाबाबतच्या अनेक पूर्वग्रहांना छेद देत लीना मोगरे यांनी स्वत फिटनेसचा नवा धडा घालून दिला आहे. लीना यांनी फूड सायन्स आणि न्यूट्रिशनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली असून स्पोर्ट्स न्यूट्रिशनमध्ये स्पेशलायझेशन केले आहे. ‘लीना मोगरेज फिटनेस’ हा प्रसिद्ध ब्रॅण्ड त्यांनी सुरू केला असून मुंबई आणि मुंबईबाहेरही त्यांच्या जिम कार्यरत आहेत. आरोग्यपूर्ण दीर्घायुष्यासाठी व्यायामाचे महत्त्व आपण जाणतोच, पण कुणाला कुठल्या प्रकारचा व्यायाम उपयुक्त ठरेल याबाबत मनात गोंधळ असतो. सेलिब्रिटींसारखे शरीरसौष्ठव आपल्यालाही असावे, पण त्यासाठी काय करायला हवे? किती वेळ आणि कोणता व्यायाम करायला हवा हे कळत नाही. आरोग्य आणि फिटनेसविषयीच्या अशा अनेक प्रश्नांना थेट मोगरे यांच्याकडून उत्तरे मिळविता येणार आहेत. कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश मिळेल.

शुक्रवार, २७ नोव्हेंबर
स्थळ : स्वा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क,
दादर (प.)
वेळ : सायंकाळी ५.४५