मध्य, हार्बर, पश्चिम मार्गावर आज (रविवार) सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाइनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.
सीएसटीला ये-जा करणाऱ्या स्लो लोकल सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत १० मिनिटे उशिराने धावणार आहेत. मेन लाइनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे केली जातील. ब्लॉकदरम्यान ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यानची डाऊन स्लो मार्गावरील वाहतूक सकाळी १०.४८ ते दुपारी ४.२३ वाजेपर्यंत डाऊन फास्ट मार्गावरून चालवण्यात येणार आहे. त्यामुळे डाऊन स्लो मार्गावरील लोकल गाड्या कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत. येथील प्रवाशांना कल्याण, डोंबिवली आणि दिवा स्थानकांतून प्रवास करता येईल. सीएसटीहून सकाळी १०.२० ते दुपारी २.४२ या वेळेत डाऊन फास्ट मार्गावरून सुटणाऱ्या सर्व लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड, दिवा येथे थांबतील. अप फास्ट लोकल गाड्यांना सकाळी ११ ते दुपारी ३.८ या वेळेत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला येथे थांबे असतील. त्यामुळे या लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत.