शनिवारी भाऊबीजेच्या दिवशी सुट्टी नसल्याने अनेक भावा-बहिणींनी भाऊबीज रविवारी सुट्टीच्या दिवशी आपापल्या कुटुंबासह एकत्र साजरी केली. मात्र या कुटुंबीयांना रविवारी रेल्वेच्या मेगाब्लॉकचा सामना करावा लागला. अभियांत्रिकी कामानिमित्ताने घेतलेल्या या मेगाब्लॉकमुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीनही मार्गावरील अनेक गाडय़ा रद्द झाल्या होत्या. तसेच गाडय़ाही उशिराने धावत होत्या. त्यामुळे सर्वच मार्गावरील स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली होती. लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या महिलांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागला.
अनेकांनी शनिवारी संध्याकाळी भाऊबिजेचे बेत आखले. भावाच्या किंवा बहिणीच्या घरी मुक्काम करून रविवारी सकाळी आपापल्या घरी जाण्यासाठी निघालेल्या सर्वाच्या मार्गात तीनही मार्गावरील मेगाब्लॉक आडवा आला. रविवारी सकाळी ११ पासून सर्वच मार्गावरील गाडय़ांची वाहतूक दिरंगाईने सुरू झाली मेगाब्लॉकची कामे सुरू झाल्यानंतर हा विलंब २०-२५ मिनिटे एवढा झाला. त्यात काही सेवा रद्द केल्याने गर्दीत आणखी भर पडली. दरम्यान, सकाळी १०.३०पासूनच सर्व स्थानके महिला, पुरुष आणि मुलांच्या गर्दीने गजबजून गेली. त्यातही महिला डब्यांमध्ये चढण्यासाठी एकच गर्दी होती. आधीच खचाखच भरलेल्या डब्यांमध्ये लहान मुलांसह चढताना महिलांचे प्रचंड हाल झाले. त्यामुळे काही महिलांनी थेट सर्वसाधारण डब्यांकडे आपला मोर्चा वळवला होता.
मेट्रोही गजबजलेली!
सुटीचा दिवस, सणाचा उत्साह आणि त्यानिमित्ताने १० रुपयांचा सवलतीचा दर यांमुळे रविवारी वर्सोवा-घाटकोपर मेट्रोही प्रचंड गजबजलेली होती. पूर्व उपनगरांतून पश्चिम उपनगरांत जाण्यासाठी आणि परतीच्या प्रवासासाठी अनेकांनी घाटकोपरला उतरून केवळ १० रुपयांतच मेट्रो सफारीचा आनंद लुटला. त्यामुळे अंधेरी आणि घाटकोपर या स्थानकांवर तिकीट खरेदीसाठी लांबच लांब रांगा होत्या.