छत्रपती शिवाजी टार्मिनस स्थानकाजवळ हार्बर मार्गावर रविवारी एका लोकलचा डबा रूळांवरून घसरल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. हा मार्ग दोन तास बंद राहिल्याने या दरम्यान दहा अप व डाउन सेवा रद्द करण्यात आल्या. त्याशिवाय मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरही गाडय़ा उशिरानेच धावत होत्या. आधीच मेगाब्लॉक आणि त्यात ही दुर्घटना त्यामुळे प्रवाशांचे मेगाहाल झाले.
पनवेलहून सीएसटीकडे येणारी ही लोकल सकाळी साडेदहा वाजता प्लॅटफॉर्ममध्ये शिरत असताना पनवेलच्या दिशेचा दुसरा डबा रुळांवरून घसरला. ही गाडी प्लॅटफॉर्म एक आणि दोन यांच्यामध्येच अडकल्याने हार्बर मार्गासाठीच्या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील वाहतुकीवर  परिणाम झाला. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी मध्य रेल्वेला तब्बल दोन तास लागले. या दरम्यान हार्बर मार्गावरील काही गाडय़ा प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरून वळवण्यात आल्या. त्याचा फटका हार्बर तसेच मुख्य या दोन्ही मार्गाना बसला. त्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक नेहमीपेक्षा उशिरानेच सुरू होती.
दरम्यान, दुपारी १२.४६ वाजता हा बिघाड दुरुस्त झाल्यानंतर या मार्गावरून पुन्हा वाहतूक सुरू झाली. या दरम्यान हार्बर मार्गावरील दहा सेवा रद्द करण्यात आल्या.
मेगाब्लॉक रद्द?
या दुर्घटनेनंतर रविवारी प्रस्तावित असलेला मेगाब्लॉक रद्द केल्याची अधिकृत माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने प्रसारमाध्यमांना दिली. मात्र हीच माहिती मध्य रेल्वेचे स्टेशन अधीक्षक, तिकीट बुकिंग कर्मचारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना नसल्याचे समोर आले. वाशी, पनवेल येथील अनेक स्थानकांवर ही माहिती पोहोचलीच नसल्याने रेल्वे कर्मचारी आणि प्रवासी यांच्यात वाद रंगले होते. मध्य रेल्वेतर्फे मेगाब्लॉक रद्द केल्याचे सांगण्यात येत असले, तरी गाडय़ांची दिरंगाईने चालू असलेली वाहतूक पाहता मेगाब्लॉक सुरू असल्याचेच प्रवाशांना वाटत होते.