लोकसंख्या नियंत्रणासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असला तरी पुरुषी मानसिकतेत जोपर्यंत बदल होणार नाही तोपर्यंत शासनाच्या नसबंदी कार्यक्रमात पुरुषांचा सहभाग अत्यल्पच राहणार हे पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. आरोग्य विभागाने राज्यासाठी गेल्या वर्षी पाच लाख ५० हजार नसबंदी शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट निश्चित केले होते. हे उद्दिष्ट ९२ टक्के पूर्ण केले असले तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण केवळ ३.७ टक्के एवढेच आहे.
आरोग्य विभागाने नसबंदीसाठी व्यापक कार्यक्रम हाती घेतला असून २०१२-१३ मध्ये एकूण पाच लाख पाच हजार शस्त्रक्रियांमध्ये केवळ १८,८७७ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतल्या तर महिलांचे प्रमाण ४,८६,२४३ एवढे आहे. गेल्या वर्षी २०१३-१४ मध्ये या उद्दिष्टात दहा हजाराने वाढ केल्यानंतर केवळ १७,३६५ पुरुषांनी नसबंदी केली तर ४,८६,८६८ महिलांनी कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया करून घेतल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून उघड झाले आहे. टक्केवारीच्या भाषेत बोलायचे झाल्यास पुरुषांच्या शस्त्रक्रियेची टक्केवारी केवळ ३.४ टक्के एवढीच आहे.
पाच वर्षांपूर्वी आरोग्य विभागाने कुटुंबनियोजन शस्त्रक्रियांसाठी विशेष मोहीम राबविली होती. त्यावेळी पंचवीस ते चाळीस हजार पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केल्या होत्या. एक तर उच्चभ्रू वर्ग किंवा आदिवासी पुरुष हेच नसबंदी करून घेण्यासाठी राजी होतात. आदिवासी विभागात प्रामुख्याने मातृसत्ताक पद्धत असल्यामुळे पुरुषांच्या नसबंदीचे प्रमाण आदिवासींमध्ये जास्त आढळून येते. पुरुषांच्या नसबंदी शस्त्रक्रियेच्या तंत्रज्ञानात सुधारणा झाली असून नो स्कॉल्पेल व्हॅसेक्टॉमी हे नवीन तंत्र आरोग्य विभागाकडून वापरण्यात येते. तसेच शस्त्रक्रियेनंतर थोडय़ाच वेळात घरीही जाऊ दिले जाते.
 महिलांना मात्र रुग्णालयात दाखल व्हावे लागत असतानाही त्यांच्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाण जास्त असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. यातही बाळंतपणासाठी आलेल्या महिला मुलगा अथवा मुलीच्या जन्मानंतर लगेचच कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी जास्त प्रमाणात तयार असल्याचे दिसून येते.

एकूण पुरुषी मानसिकतेमुळे त्यातही मध्यमवर्गीयांचे शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण नगण्य आहे. आरोग्य विभाग कुटुंबनियोजनाची विस्ताराने माहिती सांगण्याचे काम करते. कोणी शस्त्रक्रिया करायची याचा निर्णय आम्ही कुटुंबावर सोडतो
-डॉ. सतीश पवार, राज्याचे आरोग्य संचालक