कोकणाचा सर्वागीण विकास व्हावा, कोकणी लोकांना रोजगार मिळावा, त्यांचे राहणीमान समृद्ध व्हावे तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही त्याचा फायदा
व्हावा या दृष्टीने काम करण्याची गरज आहे. परंतु, सगळ्यात आधी कोकणी माणसाची मानसिकता बदलणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
कोकण भूमी प्रतिष्ठान आयोजित ‘ग्लोबल कोकण महोत्सव २०१३’ च्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. स्पेन, फ्रान्स या देशांत सर्वाधिक पर्यटन केले जाते. तेथील किनारपट्टी प्रदेशांचा पर्यटनाच्या दृष्टीने कसा विकास करण्यात आला आहे. याचा अभ्यास करून आणि आपल्याकडची परिस्थिती, वातावरण पाहून कोकण पर्यटन विकास करायला हवा. कोकणच्या विकासाचे ध्येय बाळगून पक्षीय अभिनिवेश न ठेवता सर्वानी एकत्र येऊन काम करायला हवे. निसर्गसुंदर कोकणातील पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता विकास करायचा असेल तर केवळ पर्यटन नव्हे तर प्रदूषण न करणारे उद्योग, संशोधन केंद्रे, इंडस्ट्रियल डिझाईन क्षेत्रातील उद्योग यासारखे प्रकल्प उभारावे लागतील. माधव गाडगीळ समितीने घातलेल्या र्निबधांमुळे कोकण विकासाला अडसर निर्माण झाला आहे. परंतु, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता विकास करता येऊ शकतो. यासंबंधी पंतप्रधानांशी आपण चर्चा केली असून त्या दृष्टीने नजिकच्या काळात पावले उचलण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. लवकरच कोकणातील सर्वपक्षीय आमदारांची बैठक बोलावणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. कोकण विकासासाठी एक खिडकी योजना सुरू करण्याचे सूतोवाचही त्यांनी या वेळी केले.
ग्लोबल कोकण महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार म्हणाले की, कोकणातील तरुणांची मानसिकता बदलली आहे, बदलत आहे. पडिक जमिनी राज्य शासनाने उपलब्ध करून दिल्या तर मत्स्योद्योगाला चांगल्या प्रकारे वाव देता येईल. केरळ, आंध्र प्रदेश, गुजरात ही राज्ये मत्स्योद्योग, प्रक्रिया आणि निर्यात या क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत. परंतु, दुर्दैवाने कोकण या क्षेत्रात फारसा नाही. हे बदलणे शक्य आहे, असे ते म्हणाले.
गोरेगाव पूर्व येथील नेस्को संकुलात ७ जानेवारीपर्यंत ग्लोबल कोकण महोत्सव सुरू राहणार असून कोकणातील उद्योग, गृहोद्योग, कोकणातील उत्पादने, सेवा, संस्था यांचे स्टॉल्स यात पाहायला मिळतील. राज्याचे माजी मुख्य सचिव आणि ग्लोबल कोकणचे अध्यक्ष द. म. सुकथनकर, पर्यटनमंत्री छगन भुजबळ, जलसंपदामंत्री सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, कोकण भूमी प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यवाहक संजय यादवराव, स्वागताध्यक्ष महेश नवाथे, भाई जगताप आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या वेळी ‘कोकणचा जाहीरनामा २०२५’ श्वेतपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. कोकणच्या विकासास हातभार लावणारे आनंद तेंडुलकर, विजय जोगळेकर, रणजितराव खानविलकर, हसन चौगुले, प्रभाकर सावे, बापू नाईक, नंदकिशोर साळसकर, आर एस नाईकवाडी यांचा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.