वाकोला येथील घटनेच्या पाश्र्वभूमीवर सर्वच ९३ पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या मानसिक चाचणीचे आदेश देणाऱ्या आयुक्त राकेश मारिया यांनी शस्त्र बाळगणाऱ्या सर्वाचीच दर महिन्याला चाचणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. लष्करात अशा प्रकारच्या घटना वाढू लागल्या तेव्हा प्रशासनाने अशा प्रकारे चाचणी सुरू केली होती तसेच नाकारण्यात आलेल्या रजांमुळे असे प्रकार घडत असल्याचे लक्षात आल्यानंतर रजांमध्ये सुसूत्रताही आणली होती. मुंबई पोलीस दलातही त्याच पद्धतीने कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
वरिष्ठ निरीक्षक विलास जोशी यांनी शिस्तीचा भाग म्हणून दिलीप शिर्के याला गणवेश धारण करून मगच आपल्याशी बोलण्यास सांगितले. त्यामुळे गणवेश धारण केलेल्या शिर्के याने पिस्तूलही आणले. परंतु साध्या वेशातील शिर्के याचे म्हणणे त्याच वेळी ऐकले असते तर अनर्थ टळला असता, असेही आता बोलले जात आहे. वास्तविक शिर्के यांचा राग वाकोला पोलीस ठाण्यातील बढतीने सहायक निरीक्षक बनलेल्या एका अधिकाऱ्यावर होता. हा अधिकारी प्रचंड भ्रष्ट असल्याचे बोलले जात होते आणि त्यावरून त्याचा वादही झाला होता, असेही सूत्रांनी सांगितले.
शस्त्र बाळगणाऱ्या सर्वच पोलिसांची आता काटेकोरपणे मानसिक चाचणी केली जाणार आहे. या सर्वाचा डेटाही पोलीस ठाण्यात ठेवला जाणार आहे. मानसिक चाचणीबाबतचा अहवाल विरुद्ध आल्यास संबंधिताकडून शस्त्र काढून घेतले जाणार आहे. हा अहवाल तयार करताना संबंधिताची कौटुंबिक पाश्र्वभूमीचीही नोंद ठेवली जाणार आहे, असे या सूत्रांनी सांगितले.

वाकोलासारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रत्येक पोलिसाच्या मानसिक स्थितीचा आढावा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच्या मानसिक स्थितीनुसार त्याला कुठल्या उपायांची गरज आहे, याचाही लेखाजोखा ठेवला जाणार आहे.  – राकेश मारिया, पोलीस आयुक्त