खगोलशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत दुर्मीळ घटना म्हणजेच ‘बुधाचे अधिक्रमण’ येत्या ९ मे रोजी पार पडणार आहे. हे अधिक्रमण बघण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी खगोल अभ्यासक संघटनांनी खास दुर्बिणींची सोय केली आहे. २०३२ सालाशिवाय हे ‘बुधाचे अधिक्रमण’ पाहता येणार नसल्याने सोमवारी खगोलप्रेमींनी हे अधिक्रमण पाहावे असे आवाहन खगोल संस्थांनी केले.
सूर्य, बुध व पृथ्वी हे एका सरळ रेषेत आल्यामुळे बुधाचे अधिक्रमण ही घटना घडते. ही परिस्थिती फार दुर्मीळ असून या वेळी सूर्याकडे खास ‘फिल्टर’ बसवलेल्या दुर्बिणीतून पाहिल्यास बुध ग्रहाचा काळा ठिपका सूर्यबिंबावरून सरकताना दिसेल. पुढील घटना पाहण्यासाठी १६ वर्षे वाट पाहावी लागणार असल्याने ही संधी सोडू नये, असे आवाहन खगोल मंडळाचे डॉ. अभय देशपांडे यांनी केले.

* बुधाच्या अधिक्रमणासाठी सूर्यबिंबाकडे पाहावे लागणार असल्याने थेट सूर्यबिंबाकडे दुर्बीण रोखून पाहू नये.
* दुर्बिणीमधून पाहताना विशेष प्रकारचा ‘फिल्टर’ लावूनच सूर्याकडे पाहावे. अन्यथा डोळ्यांना गंभीर दुखापत होऊ शकते.
* काळी काच, काळी फिल्म, एक्स-रे कॉपी यातूनही हे अधिक्रमण पाहू नये.

कुठे बघाल?
मुंबई, ठाणे, नाशिक
* दादर चौपाटी येथील स्वामी नारायण गणेश द्वारजवळील महापालिका उद्यान, दादर (प.)
* नेहरू तारांगण व नेहरू विज्ञान केंद्रातर्फे वरळी सी-फेसवर निरीक्षणाचा कार्यक्रम, वरळी
* कल्याण – हिमालय सोसायटी, लोकधारा, कल्याण (पू.)
* बदलापूर – बदलापूर बायपास रस्ता, तुलसी आंगण सोसायटीपुढे, हॉटेल योगेश्वरजवळ, बदलापूर (पू.)
* तसेच, आदर्श विद्या मंदिराचे प्रांगण, बदलापूर (पू.)
* नाशिक – विद्या प्रबोधिनी शाळा, भोसला मिलिटरी कॅम्पस, कॉलेज रोड, नाशिक

किती वाजता बघाल?
अधिक्रमण मुंबईतून पाहताना भारतीय प्रमाणवेळेनुसार, ४ वाजून ४० मिनिटांनी बुध ग्रह सूर्याला स्पर्श करणार असून त्यानंतर पुढच्या दोन-तीन मिनिटांत बुधाचा पूर्ण ठिपका सूर्यबिंबावर दिसू शकेल. हा बुधाचा ठिपका सूर्यबिंबावर दोन तासांहून अधिक काळ म्हणजेच ७ वाजून ३ मिनिटांनी सूर्यास्त होईपर्यंत पाहता येईल.