डागडुजी सुरू असतानाच रहिवाशांना नोटिस

दक्षिण मुंबईतील काळबादेवी वेलकर स्ट्रीट येथील जैन भवन ही इमारत ‘मुंबई मेट्रो रेल कॉपरेरेशन’च्या मेट्रो-३ या कुलाबा-वांद्रे-सीप्झ दरम्यानच्या भुयारी मार्ग प्रकल्पात बाधित होणार आहे. एमएमआरसीने या इमारतीला नोटीस बजावल्याने येथील व्यावसायिक अस्वस्थ झाले असून त्यांनी याबाबत एमएमआरसीकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

जैन भवन या चार मजली इमारतीत २६ व्यावसायिक गाळेधारक आहेत. इमारत जुनी असल्याने म्हाडाने इमारतीची पाहणी करून दुरुस्ती करण्याची सूचना फेब्रुवारी, २०१७ रोजी इमारतीच्या सदस्यांना दिली. त्यानंतर इमारतीतील सदस्यांनी स्वत:चे पैसे आणि म्हाडाचा दुरुस्ती निधी एकत्र करून दुरुस्ती करण्याचे ठरवले. सदस्यांनी ठरल्याप्रमाणे इमारत दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले. गेले महिनाभर इमारत दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यातच २५ मे, २०१७ रोजी एमएमआरसीने इमारत मेट्रो-३ प्रकल्पात बाधित होत असून रिकामी करण्याची नोटीस बजावली. इमारत बाधित होत असल्याचे कळताच सदस्यांनी दुरुस्तीचे काम त्वरित थांबवले.

दुरुस्तीकरिता इमारतीच्या सदस्यांनी स्वत:च्या खिशातील सुमारे १२ लाख आणि म्हाडाचे पाच लाख खर्च केले आहेत. या आधी मेट्रो-३मध्ये बाधित होणाऱ्या इमारतींची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यात आमच्या इमारतीचे नाव नव्हते. परंतु, आता इमारत बाधित होत असल्याची नोटीस आल्याने येथील व्यावसायिक चक्रावून गेले आहेत. इमारत मेट्रो -३च्या कामासाठी बाधित होणार होती तर त्याची कल्पना आम्हाला आधी का देण्यात आली नाही. आम्ही हे दुरुस्तीचे काम हाती घेतले नसते, असा प्रश्न येथील गाळेधारकांनी केला आहे.

आधी पाहणी केली का?’

आमची इमारत मेट्रोच्या कामात बाधित ठरत असेल तर आम्ही सहकार्य करू. मात्र त्या आधी एमएमआरसीने आमच्या इमारतीची पाहणी केली आहे का याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. या बाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून लक्ष घालण्यास सांगणार आहोत, असे जैन भवन इमारतीचे सह मालक हिराचंद जैन यांनी सांगितले.