शिवसेनेचा विरोध झुगारुन मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाने अखेर कुलाबा – वांद्रे – सिप्झ दरम्यानच्या ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली आहे. कफ परेड, आझाद मैदान, सायन्स म्युझियम स्थानक, विद्या नगरी, सहार रोड आणि एमआयडीसी स्थानक आदी ठिकाणी भूसर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाचा मानस आहे.

रेल्वेवर प्रवाशांचा आलेला अतिरिक्त ताण लक्षात घेऊन कुलाबा – वांद्रे – सिप्झ दरम्यान ३३.५ कि.मी. लांबीचा भूमिगत ‘मेट्रो-३’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी भूसर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. ‘मेट्रो-३’च्या मार्गातील कफ परेड, आझाद मैदान, सायन्स म्युझियम स्थानक, विद्या नगरी, सहार रोड आणि एमआयडीसी स्थानक येथे भूसर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. भूसर्वेक्षण आणि बॅरिकेट बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ‘मृदा’ चाचणी (जिओ टेक्नॉलॉजी) करण्यात येणार आहे.

‘मेट्रो-३’साठी भूमिगत बोगदा खोदण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाचे संचालक (प्रकल्प) एस. के. गुप्ता यांनी दिली.

‘मेट्रो-३’च्या माध्यमातून मुंबईकरांना सुरक्षित आणि उत्तम प्रवासासाठी एक पर्याय देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी सांगितले.

महाधिवक्तयांचे मत डावलून काम; काँग्रेसचा आरोप

मुंबई: मुंबईतील रस्ते घोटाळ्यातील आरोपी असलेल्या जे. कुमार इन्फ्रा प्रोजेक्टस या कंपनीला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील एमएमआरडीएने महाधिवक्तयांचे मत डावलून मुंबई मेट्रो -३ आणि ७ चे पाच हजार कोटींचे काम दिले आहे. हे काम देताना निविदा प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.