मेट्रो प्रशासनाकडून मध्यरात्री वृक्षतोडणी; रहिवासी-कंत्राटदारामध्ये बाचाबाची

उच्च न्यायालयापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानेही हिरवा कंदील दाखविल्यानंतर अवघ्या दोन दिवसात मेट्रो-३ या महत्त्वाकांक्षी वाहतूक प्रकल्पाआड येणाऱ्या दक्षिण मुंबईतील वृक्षांच्या तोडकामाला सुरुवात करण्यात आली.  इथल्या जुन्या, जीर्ण वृक्षांशी केवळ या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांचीच नव्हे तर कामधंद्यानिमित्त येणाऱ्यांचीही नाळ जुळली गेली आहे. त्यामुळे दोन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी या परिसरात येणारा नोकरदार, व्यावसायिक वर्गही या उजाड परिसराकडे पाहून हळहळत होता.

कुलाबा ते सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाच्या मार्गातील पाच हजार झाडांच्या कत्तलीवर घातलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी उठवली. त्यामुळे ही झाडे येत्या काही दिवसात कापली जाणार हे जवळपास निश्चितच झाले होते.

मेट्रो प्रशासनाने शुक्रवारपासून वृक्षतोडीला सुरुवात केली. रविवारी रात्री साडेनऊ ते मध्यरात्री अडीचपर्यंत झाडे तोडण्याचे काम सुरू होते. यात चर्चगेट येथील जे.टाटा मार्गावरील दोन डेरेदार वृक्षांचाही समावेश आहे. यावेळी स्थानिकांनी वृक्षतोडीला विरोध केला. त्यामुळे कंत्राटदार आणि स्थानिकांमध्ये बाचाबाची झाली. जे.टाटा मार्गावरील मोती भवनमध्ये राहणारे अश्विन नागपाल यांनी रस्त्यावर उतरून वृक्षतोडीकरिता आलेल्या कर्मचाऱ्यांना विरोध केला. मात्र, ‘हे कर्मचारी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी

मला धमकावत वृक्षतोड सुरूच ठेवली,’ असे नागपाल यांनी सांगितले. त्यानंतर रहिवाशांनी पोलिसांना येथे बोलावले. काही काळ वृक्षतोड थांबविण्यात आली. मात्र मध्यरात्री पुन्हा कामाला सुरुवात करण्यात आली.

शुक्रवार ते सोमवार या तीन दिवसांच्या कालावधीत विधानभवन परिसर, हुतात्मा चौक, आझाद मैदान, ग्रँट रोड, महालक्ष्मी, वरळी पारपत्र कार्यालय, सिद्धिविनायक मंदिर येथेही वृक्षतोड करण्यात आली, तर काही ठिकाणी झाडे कापण्यापूर्वी फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे. त्यामुळे एरवी डेरेदार वृक्षांच्या सावलीने झाकला जाणारा हा परिसर सोमवारी अचानक ओकाबोका व उजाड दिसू लागला होता.

झाडांसाठी मेणबत्त्या

जे. टाटा मार्गावर रविवारी रात्री झालेल्या वृक्षतोडीला विरोध म्हणून स्थानिक रहिवाशांनी येथे मेणबत्ती मोर्चा काढला. जे. टाटा मार्गावरील सम्राट उपाहारगृहाबाहेरील पदपथावर सोमवारी मेणबत्त्या लावण्यात आल्या होत्या.