मासिक पासचे दर ४५ ते ५० रुपयांनी वाढले
मुंबई मेट्रोवन प्रा. लि. या कंपनीला होणारा ३०० कोटी रुपयांचा वार्षिक तोटा भरून काढण्यासाठी राज्य सरकारने काही अनुदान द्यावे, ही मागणी पूर्ण न झाल्याने अखेर मेट्रोच्या तिकीट दरांत वाढ करण्यात आली आहे. मेट्रोचे किमान भाडे सध्या आहे तेवढे म्हणजे १० रुपयेच ठेवून पुढील टप्प्यांत पाच रुपयांची दरवाढ झाली आहे. तिकिटांबरोबरच मासिक पासच्या दरांतही ४५ ते ५० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली असून ही दरवाढ १ डिसेंबरपासून लागू होणार आहे.
मुंबईतील या पहिल्यावहिल्या मेट्रोचा परिचालन खर्च आणि त्यातून होणारे प्रवासी उत्पन्न यांत तब्बल ३०० कोटींची तफावत असल्याने मुंबई मेट्रोवन प्रा. लि.ने तिकीट दरवाढ करण्याची भूमिका घेतली होती. मेट्रोचे दर किमान १० ते कमाल ११० रुपये असावेत, अशी शिफारस दरनिश्चिती समितीने केली होती. या शिफारशीचा आधार घेत मेट्रोचे तिकीट दर वाढवण्याचा मानस व्यक्त करण्यात आला होता. ही दरवाढ टाळण्यासाठी राज्य सरकारने मेट्रोला अनुदान द्यावे, असा पर्याय सुचवत मुंबई मेट्रोवनने राज्य सरकारसमोर ठेवत ३१ ऑक्टोबपर्यंतची मुदत दिली होती. मुंबई मेट्रोवनने या मुदतीत एका महिन्याची वाढ केली असूनही राज्य सरकारने काहीच प्रतिसाद न दिल्याने अखेर मुंबई मेट्रोवन प्रा. लि.ने ही वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले.
मासिक पासासाठी ४५ फेऱ्यांचे भाडे घेतले जाते. यात प्रत्येक फेरीमागे एक रुपया अशी ४५ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मासिक पास दोन टप्प्यांत उपलब्ध असून सध्या त्यांचे शुल्क ६७५ आणि ९०० रुपये एवढे आहे. त्यात वाढ होऊन आता प्रवाशांकडून ७२५ आणि ९५० रुपये घेतले जाणार आहेत. हे नवे दर १ डिसेंबरपासून लागू होणार आहेत.

’मेट्रोचे तिकीट पूर्वी चार टप्प्यांसाठी मिळत होते, मात्र आता या दरवाढीनुसार ते पाच टप्प्यांत मिळणार आहे. पूर्वी चार टप्प्यांसाठी एकेरी प्रवासाचे दर १०, २०, ३० आणि ४० रुपये एवढे होते.
’नव्या टप्प्यांप्रमाणे हे दर १०, २०, २५, ३५ आणि ४५ रुपये एवढे असतील. दुहेरी प्रवासासाठी पूर्वी १०, १५, २५ आणि ३० रुपये आकारले जात होते. आता नव्या टप्प्यांप्रमाणे १०, २०, २२.५०, ३० आणि ३५ रुपये असे तिकीट दर ठेवण्यात आले आहेत.