रेल्वेतही आता मेट्रोसारखीच तिकीट प्रणाली; दिल्लीत प्रायोगिक तत्त्वावर चाचणी

विनातिकीट प्रवाशांना आळा घालण्यासाठी आणि प्रवासी नसलेल्यांना स्थानकात येण्यापासून रोखण्यासाठी रेल्वेने आता मेट्रोप्रमाणेच ‘अ‍ॅक्सेस कंट्रोल सिस्टिम’ अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्रणालीद्वारे स्थानकामध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे अधिकृत तिकीट नसेल, तर प्रवेश करण्यास मज्जाव केला जातो. सध्या ही प्रणाली दिल्लीतील एका स्थानकावर बसवण्यात येणार असून त्या प्रणालीला मिळणारा प्रतिसाद पाहून तिची अंमलबजावणी अन्यत्र करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकांवर या प्रणालीची अंमलबजावणी करणे जोखमीचे ठरणार आहे. सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टिमद्वारे (क्रिस) या चाचण्या घेतल्या जात आहेत.

मुंबईसह दिल्ली मेट्रोमध्येही ‘अ‍ॅक्सेस कंट्रोल सिस्टिम’ कार्यरत आहे. या प्रणालीत स्थानकात प्रवेश करण्याच्या जागा निश्चित करण्यात येतात. त्या जागांवर अ‍ॅक्सेस कंट्रोल यंत्रे बसवली जातात. प्रवाशांनी काढलेले अधिकृत तिकीट यंत्राद्वारे ‘स्कॅन’ करून नंतरच प्रवाशांना स्थानकात प्रवेश दिला जातो. याच धर्तीवर आता दिल्लीतील एका स्थानकावर या प्रणालीची चाचपणी केली जाणार आहे. या प्रणालीला दिल्लीतील प्रवाशांचा प्रतिसाद कसा मिळतो, हे पाहून तिची अंमलबजावणी इतरत्र करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे ‘क्रिस’चे मुंबईतील महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी स्पष्ट केले.

या प्रणालीची अंमलबजावणी मुंबईत करण्यासाठी ‘क्रिस’ला प्रवासी संख्या या मोठय़ा घटकाचा सामना करावा लागणार आहे. या प्रणालीच्या यंत्रांजवळ गर्दी होण्याची शक्यता मोठी आहे.

फायदे काय?

  • प्रत्येक प्रवाशाला अधिकृत तिकीट काढावे लागेल.
  • तिकीट विक्रीतील गैरव्यवंहार, दलाली कमी होईल
  • स्थानकात भिकारी, गर्दुल्ले शिरण्याचा मार्ग राहणार नाही.
  • रेल्वेचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
  • प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी मिळू शकेल.