‘म्हाडा’ या संस्थेच्या संकेतस्थळाशी मिळतेजुळते असे बनावट संकेतस्थळ बनवणाऱ्यांविरोधात म्हाडाने सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. या संकेतस्थळावरून म्हाडा सोडतीतील बनावट प्रतीक्षा यादीही प्रसिद्ध होत होती. ही माहिती म्हाडाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला मिळाल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर आता हे संकेतस्थळ बंद करण्यात आले आहे. म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ http://www.mhada.gov.in हे आहे. हे संकेतस्थळ नेट मॅजिक डाटा सेंटरमध्ये होस्ट करण्यात येते. मात्र या संस्थेच्या नावाने http://www.mhada.net  हे बनावट संकेतस्थळ सुरू करण्यात आले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नेट मॅजिक डाटा सेंटरकडून म्हाडाने या बनावट संकेतस्थळाबाबत अहवाल मागवत हे संकेतस्थळ बंद केले. या बनावट संकेतस्थळामुळे लोकांची आर्थिक फसवणूक होऊ नये, यासाठी कारवाई करण्यात आली. याबाबत सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे.