मुंबईतील म्हाडाच्या एकूण ९९७ घरांच्या विक्रीसाठी यंदा ऑनलाइन अर्ज अधिकाधिक लोकाभिमुख केल्यानंतर यासाठी ३१ मे रोजी काढली जाणारी सोडत मुंबईकरांना प्रथमच घरबसल्या अनुभवता येणार आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात होणाऱ्या सोडतीचे थेट प्रक्षेपण (वेबकास्ट) लोकांना पाहता येणार आहे. त्यामुळे सोडतीच्या ठिकाणी गर्दी न करता लोकांना घरी बसून सोडत अनुभवता येणार आहे.    
यंदा तयार असलेल्या घरांसाठीच सोडत जाहीर करण्यात आली आहे. शीव, मानखुर्द, मुलुंड, मालाड आणि गोरेगाव येथील आर्थिक दुर्बल, अल्प तसेच मध्यम उत्पन्न गटासाठी असलेल्या घरांसाठी १४ मेपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार असून १८ मेपर्यंत अर्ज तसेच पैसे स्वीकृती केली जाणार आहे. २० मेपर्यंत अनामत रक्कम भरावयाची असून स्वीकृत अर्जाची अंतिम यादी २८ मे रोजी जाहीर केली जाणार आहे.   
म्हाडा घरांच्या किमती खासगी विकासकाच्या तुलनेत शक्य तितक्या कमी करण्यात आल्याचा दावा मुंबई गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी सुधीर खानापुरे यांनी केला. दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटाची किंमत निश्चित करताना फायद्याचा विचार केला जात नाही, तर मध्यम उत्पन्न गटाकडून फक्त दहा टक्के फायदा घेतला जातो, असेही त्यांनी सांगितले. निवृत्त लोकायुक्त, माहिती तंत्रज्ञान विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच तज्ज्ञांची देखरेख समिती नियुक्त करण्यात आली असून त्यांची दर आठवडय़ाला बैठक होते. या समितीने सोडत पारदर्शक असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. याशिवाय आयआयटीने ही पद्धत संपूर्ण पारदर्शक असल्याचे म्हटले आहे.
२००९ ते २०१३ या काळातील म्हाडाच्या सर्व इमारतींना निवासयोग्य प्रमाणपत्र मिळविण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. २०१४ मधील फक्त तीन इमारतींना निवासयोग्य प्रमाणपत्र मिळणे बाकी असून तेही लवकर मिळेल, असा विश्वास खानापुरे यांनी व्यक्त केला. यंदा ऑनलाइन अर्ज भरताना इंग्रजी आणि मराठी लाइव्ह कॉमेन्ट्री टाकण्यात आली आहे. त्यामुळे कोणाच्याही मदतीशिवाय अर्ज भरता येऊ शकतो. कुणी तरी खोड काढली आणि समजा अर्जात काही वेळा चुकीचे छायाचित्र लागले तर त्याबाबतचा संदेश एसएमएसद्वारे पोहोचेल. तोपर्यंत त्याचा अर्ज बाद होणार नाही आणि त्याला एक संधी मिळू शकते, असेही खानापुरे यांनी स्पष्ट केले.

म्हाडाच्या सोडतीच्या दिवशी तोबा गर्दी होते. त्यासाठी आवश्यक ती उपाययोजना म्हाडामार्फत केली जाते, परंतु यंदा प्रथमच घरबसल्या लोकांना आपण सोडतीत यशस्वी झालो किंवा नाही, हे अनुभवता येणार आहे.
– सुधीर खानापुरे, मुख्य अधिकारी, मुंबई गृहनिर्माण मंडळ