म्हाडाच्या २४१७ घरांची सोडत; विजेत्यांना आनंदाश्रू अनावर

एमएमआरडीएने पनवेल येथे बांधलेल्या २४१७ घरांची गिरणी कामगारांसाठीची सोडत ‘म्हाडा’तर्फे शुक्रवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडली. अनेक वर्षांनी गृहस्वप्न पूर्ण झाल्याने अनेक गिरणी कामगार व त्यांचे वारस भावूक झाले होते. मात्र सोडत असूनही अनेक कामगार किंवा त्यांचे वारस उपस्थित न राहिल्याने सभागृहात सुरुवातीला काहीसा निरुत्साह दिसून आला. मात्र १ लाख ३८ हजार ९८६ कामगारांमधून आपला क्रमांक लागल्याने विजेत्या कामगारांना आपल्या भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. सोडतीवेळी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, गिरणी कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर आदी उपस्थित होते.

एमएमआरडीएतर्फे बांधण्यात आलेल्या प्रत्येक १६० चौरस फुटाच्या दोन सदनिका (परिस्थितीनुरूप शक्य असलेली जोडघरे) याप्रकारे प्रत्येकी एका घरासाठी ६ लाख रुपये किमतीच्या घरांसाठीची सोडत शुक्रवारी सकाळी वांद्रे येथे पार पडली. एकूण ५८ गिरण्यांमधील कामागारांना या सोडतीत घरे लागली असून त्यांना एकूण २४१७ घरांचे वाटप करण्यात आले.

या वेळी सोडतीसाठी सुरुवातीला काहीसे कमी असलेले सभागृह बऱ्याच कालावधीने भरल्याने एकंदर कामगारांचा निरुत्साह असल्याचे वातावरण असल्याचे चित्र होते. अनेक कामगार किंवा त्यांचे वारस गावी असल्याने ते सोडतीला उपस्थित नसल्याचे दिसले. सोडत सुरू होताच अनेकांची नावे येऊनदेखील व्यासपीठावर कोणीच न आल्याने अखेर विनोद तावडे यांनी ध्वनिक्षेपकाचा ताबा घेत नावे वाचण्यास सुरुवात केली. त्यानंतर सोपान कदम या कामगाराचे नाव पुढे आले. त्यांचे वारस दिलीप कदम उपस्थित असल्याने ते पुढे आल्यावर त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ज्या कामगारांना घरे लागली त्यांनी व्यासपीठावर येऊन मान्यवरांच्या हस्ते सत्काराचा स्वीकार केला.

आमचा लढा खऱ्या अर्थाने यशस्वी झाला. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले हक्काचे घर मिळाल्यामुळे आनंद झाला. मात्र इथून पुढेही अन्य कामगारांच्या घरांसाठी लढणार आहे. – रमेश शितोळे, सेंच्युरी मिलचे कामगार