पुढील वर्षअखेरीस १२०० घरे ; पुनर्विकासालाही चालना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवडणाऱ्या घरांसाठी आग्रह धरल्यामुळे म्हाडा ही इतर वेळी संथ असणारी शासकीय संस्था आता जोमाने कामाला लागली आहे. भविष्यात म्हाडाने मुंबई परिसरात साडेपाच हजार घरे उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित केले आहे. याशिवाय पुढील वर्षअखेरीस १२०० घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

याप्रकरणी म्हाडाने शासनाला सादर केलेल्या टिप्पणीत ही माहिती देण्यात आली आहे. मुंबई गृहनिर्माण महाप्रकल्पांतर्गत म्हाडाने मार्च २०१७ पर्यंत पूर्व उपनगरात २३ हजार ९०५ तर पश्चिम उपनगरात १४७५ अशी एकूण २५ हजार ३८० घरे उपलब्ध करून दिली आहेत. २०१८ पर्यंत पूर्व उपनगरात ४३० तर पश्चिम उपनगरात ७३८ अशी ११६८ घरे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. भविष्यात पूर्व उपनगरात ४२४१ तर पश्चिम उपनगरात १३५५ घरे उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. ही घरे प्रामुख्याने अत्यल्प, अल्प, मध्यम गटांसाठी असणार आहेत. अत्यल्प गटासाठी सर्वाधिक म्हणजे २४०४ घरे, तर अल्प गटासाठी ४८० आणि मध्यम गटासाठी ११०९ घरे बांधून दिली जाणार आहेत. उच्च गटासाठी फक्त ५९० घरे उपलब्ध असतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. म्हाडाने आपले सर्व गृहप्रकल्प महारेराअंतर्गत नोंदणीकृत केले आहेत. घरांचा ताबा नेमका कधी दिला जाईल, याबाबत सुस्पष्ट आश्वासन दिले असून त्यानुसारच म्हाडाच्या प्रकल्पांचे काम सुरू असल्याचेही एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

म्हाडाकडे उपलब्ध असलेल्या मोकळ्या भूखंडांची संख्या आता कमी झाली आहे. म्हाडाच्या तब्बल ५० हून अधिक भूखंडांवर झोपडपट्टी पसरली आहे. म्हाडाने स्वत:च झोपु योजना राबविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे त्यातून म्हाडाला काही हजार घरे मिळणार आहेत. याशिवाय म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासालाही चांगलीच चालना मिळाली आहे. बीडीडी चाळीच्या पुनर्विकासालाही वेग आला आहे. भविष्यात या व्यतिरिक्तही म्हाडा साडेपाच हजार घरे उभारणार आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन वर्षांत सामान्यांना परवडतील अशी घरे मोक्याच्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत, याकडेही या अधिकाऱ्याने लक्ष वेधले.

भविष्यात उपलब्ध होणारी घरे

पुढील वर्षअखेरीस उपलब्ध होणारी घरे (कंसात गट) : प्रतीक्षानगर, सायन (अल्प – २८); गव्हाणपाडा, मुलुंड (अत्यल्प – १२८); कन्नमवारनगर, विक्रोळी (मध्यम – १४०); जुने मागठाणे, बोरिवली (अत्यल्प – ६०; मध्यम – १७२); कोळे कल्याण, सांताक्रूझ पूर्व (उच्च – १७२); सिद्धार्थनगर, गोरेगाव (अल्प – ५४); कांदिवली पश्चिम (अल्प – ३६; मध्यम – ४७), शिवधाम संकुल (अत्यल्प – ६०); महावीरनगर, कांदिवली (उच्च – १७०), जुनी गोराई, बोरिवली (मध्यम – ५५).

गव्हाणपाडा, मुलुंड (अत्यल्प – १४१); कन्नमवार, विक्रोळी (अत्यल्प – ४६५, मध्यम – १४०); पीएमजीपी, मानखुर्द (अत्यल्प – १६०); विनोबा भावेनगर, कुर्ला (अत्यल्प – ३८, अल्प – ३८); अँटॉप हिल (अत्यल्प – ७८६); फिशरमेन कॉलनी, माहीम (मध्यम – ५४); प्रतीक्षानगर, सायन (अत्यल्प – ९१); पवई मनपा प्रशिक्षण केंद्र (मध्यम – ८४); पंतनगर, घाटकोपर (अत्यल्प – २१६, अल्प – १६२, मध्यम – १६२); टाटा कॉलनी, मुलुंड (मध्यम – १७८); सहकारनगर, चेंबूर (अत्यल्प – ४५); अभ्युदयनगर, काळाचौकी (अत्यल्प – ९०); जिजामातानगर, काळाचौकी (अत्यल्प – १००); ज्ञानेश्वरनगर, वडाळा (अत्यल्प – १००); आदर्शनगर, वरळी (अत्यल्प – १७१); ओशिवरा (उच्च – ३८); जोगेश्वरी (अल्प – ११७, मध्यम – १०४, उच्च – ११); चिक्कीखाना, सांताक्रूझ (मध्यम – ३३); भारतनगर, बीकेसी (उच्च – २८०); गोरेगाव पश्चिम (मध्यम – १९४, उच्च – २००); चारकोप (उच्च – ५५); कांदिवली पश्चिम (अल्प – १३३), एक्सर रोड, बोरिवली पश्चिम (मध्यम – १५९)