महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात ‘म्हाडा’कडून सामान्यांना परवडतील अशा दरांत बांधण्यात येणा-या घरांच्या किंमती वाढल्यामुळे आगामी काळात ‘म्हाडा’कडून गरिबांना परवडतील अशी कमी क्षेत्रफळाची घरे उपलब्ध करून देण्यासाठी कडक पावले उचलण्यात येणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणा-या समाजासाठी ‘म्हाडा’कडून आता एकुण १८० चौरस मीटर क्षेत्रफळाची घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काही वर्षांपासून ‘म्हाडा’कडून कमीतकमी २६९ चौरस मीटर चटई क्षेत्रफळ असणारी घरे बांधण्यात येत होती. मात्र, अशाप्रकारच्या सदनिकांमध्ये राहणा-या अनेकांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यानंतर जास्तीची रक्कम भरून या फ्लॅटसच्या मोबदल्यात ‘म्हाडा’कडून जास्त क्षेत्रफळाच्या सदनिका घेतल्याची माहिती ‘म्हाडा’चे मुख्य निरीक्षक सतीश गवई यांनी दिली. सध्या म्हाडाकडून कमीतकमी १५लाख रूपये किंमत असणारी घरे बांधण्यात आली आहेत. सामान्यांना या घरांच्या किंमती परवडत नसल्यामुळे कमी क्षेत्रफळाची मात्र, पाच ते सहा लाख रुपयांत उपलब्ध होऊ शकतील अशी घरे बांधण्याची ‘म्हाडा’ची योजना असल्याचे सतीश गवई यांनी सांगितले. अशाप्रकारची घरे बांधण्याचा प्रस्ताव यापूर्वीच ‘म्हाडा’कडून मांडण्यात आला होता. मात्र, त्यानंतर कमीतकमी २६९ चौरस फुटांची घरे बांधण्याच्या केंद्रसरकारच्या सूचनांमुळे हा बेत बारगळला. केंद्रसरकारने घरांसाठी आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार कमीतकमी २६९ चौरस फुटांची घरे बांधणे बंधनकारक असले तरी मुंबईसारख्या महानगरांतील घरांच्या गगनाला भिडलेल्या किंमती पाहता सामान्यांना परवडतील अशा माफक दरांत घरे बांधण्याची गरज असल्याचेसुद्धा सतीश गवई यांनी स्पष्ट केले.