मुंबई मंडळातील एक हजार तर कोकण मंडळातील सुमारे १८०० अशा २८०० घरांसाठी ‘म्हाडा’तर्फे पुढच्या वर्षी सोडत काढली जाईल, असे ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष सतीश गवई यांनी बुधवारी सांगितले. कन्नमवार नगर, मुलुंड यासारख्या ठिकाणी ही घरे असतील आणि त्यातील बहुतांश घरे ही अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटासाठी असतील, असे संकेत गवई यांनी दिले.
‘म्हाडा’च्या मुंबईतील ८१४ तर विरार आणि वेंगुर्ला येथील एकूण १८२७ अशा २६४१ घरांसाठी बुधवारी रंगशारदा सभागृहात सोडत काढण्यात आली. मानखुर्द, मागाठाणे, बोरिवली, विनोबा भावे नगर, कुर्ला, प्रतीक्षा नगर, शीव टप्पा ४, तुंगवा, पवई, शैलेंद्रनगर, दहिसर, कोलेकल्याण, सांताक्रूझ येथील घरांसाठी ही सोडत निघाली. या सोडतीसाठी एकूण ९३ हजार १३० अर्ज दाखल झाले होते.
मुंबईत आतापर्यंत संक्रमण शिबिरांचे पुनर्वसन रखडले होते. आता ते मार्गी लागले आहे. त्यामुळे या पुनर्वसनातून प्रामुख्याने मुंबईत सोडतीसाठी घरे उपलब्ध होतील. येत्या दोन वर्षांतील सोडतीत प्रामुख्याने अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी घरे असतील. मुंबईतील जागा संपत आल्याने ‘म्हाडा’ने ठाणे, कोकण, औरंगाबाद, पुणे यारसाख्या ठिकाणी लक्ष केंद्रित केले आहे.
भाग्यवान आनंदले..१३
उपमुख्याधिकाऱ्यांना दुसऱ्यांदा ‘लॉटरी’
‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाचे उपमुख्याधिकारी डी. के. जगदाळे यांना यंदाच्या लॉटरीत शैलेंद्रनगर, दहिसर येथील उच्च उत्पन्न गटातील घर सोडतीत लागले. गेल्या वर्षीच्या लॉटरीतही ते नशीबवान ठरले होते. त्यावेळी त्यांना पवई येथील घर मिळाले होते. पण पवईतील घरापेक्षा आता दहिसर येथील घराचा आकार मोठा असल्याने हेच घर घेणार असून पवईतील घराचे पत्र परत करणार आहे, असे जगदाळे यांनी स्पष्ट केले.