७८ टक्के शौचालयांत पाणी, तर ६२ टक्के शौचालयांमध्ये वीज नाही

मतदारांना वचनपूर्तीचा दिखावा करण्यासाठी आणि निधीचा ‘अर्थ’पूर्ण विनियोग करण्यासाठी मुंबईमध्ये म्हाडाच्या माध्यमातून खासदार आणि आमदार निधीमधून मोठय़ा प्रमाणावर सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली आहेत. मात्र सरकार निर्णयातील निकष धाब्यावर बसविण्यात आल्यामुळे या शौचालयांची दैना झाली आहे. ‘म्हाडा’च्या ७८ टक्के शौचालयांमध्ये पाणी नाही, तर ६२ टक्के शौचालयांमध्ये वीज नाही. त्यामुळे ही शौचालये अस्वच्छ असून वापराविना पडून असलेल्या या शौचालयांचा गर्दुल्ले आणि समाजकंटकांनी ताबा घेतला आहे. त्यामुळे समाजाच्या दृष्टीने ही शौचालये असुरक्षित आणि धोकादायक बनली आहेत. ‘बांधा, दुर्लक्षित करा आणि पुन्हा बांधा’ असे छुपे तत्व आणि देखभालीकडे दुर्लक्ष यामुळे बहुतांश शौचालये वापरायोग्य नसल्याचे निदर्शनास आले आहे.

मुंबईमध्ये तब्बल ७९,१५७ शौचकूपे असलेली एकूण ८,४१७ शौचालये असून त्यापैकी ६० टक्के म्हणजे ६२४४ शौचालये ‘म्हाडा’ची आहेत. खासदार आणि आमदारांच्या निधीतून ही शौचालये उभारण्यात आली आहेत. निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर वचनपूर्तीच्या नावाखाली खासदार, आमदार निधीचा वापर करुन लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघात ‘म्हाडा’च्या माध्यमातून शौचालयांची उभारणी करतात. मात्र या शौचालयांच्या उद्घाटनानंतर त्याकडे ना ‘म्हाडा’ ढुंकून पाहात ना लोकप्रतिनिधी. या शौचालयांच्या देखभालीसाठी व्यवस्थाच नाही. ‘म्हाडा’च्या ६२४४ पैकी ७८ टक्के शौचालयांमध्ये पाणीच नाही, तर ६२ टक्के शौचालयांमध्ये वीजपुरवठा नाही. पाणी नसल्यामुळे अस्वच्छता आणि वीज नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य शौचालयांमध्ये असते. त्यामुळे या शौचालयांचा वापरच होत नाही. काही ठिकाणी शौचालयाची इमारत धोकादायक अवस्थेत आहे. परिणामी, या शौचालयांचा वापर करण्यास आसपासच्या परिसरातील रहिवाशी तयार होत नाहीत. या पडीक बनलेल्या शौचालयांचा ताबा हळूहळू समाजकंटकांनी घेतला असून ही शौचालये गर्दुल्ल्यांचे अड्डे बनू लागले आहेत. त्यामुळे असुरक्षित बनलेल्या या शौचालयांच्या आसपास फिरकणेही महिलांना अशक्य बनले आहे.

राज्य सरकारने २००२ मध्ये शौचालयांबाबत एक शासन निर्णय जारी केला. सार्वजनिक शौचालये बांधल्यानंतर त्यांच्या देखभालीमध्ये लोकसहभाग अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. परंतु या अटीकडे फारसे लक्षच दिले गेले नाही. त्यामुळे ‘म्हाडा’च्या शौचालयांची अतिशय बिकट अवस्था बनली आहे. अस्वच्छ आणि धोकादायक अवस्थेतील शौचालयाच्या इमारती पाडून ती पुन्हा बांधण्याची गरज आहे. पण पुनर्बाधणीनंतरही या शौचालयांची देखभाल होऊ शकली नाही तर पैशांचा केवळ अ़पव्ययच होईल. शौचालयांच्या बाबतीत ‘बांधा, दुर्लक्ष करा आणि पुनर्बाधणी करा’ हा फेरा जोपर्यंत सुरू आहे, तोपर्यंत नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित शौचालये मिळणे अवघड आहे.

‘म्हाडा’ने बांधलेली शौचालये पाण्याअभावी अस्वच्छ आणि वीजेअभावी असुरक्षित बनली आहेत. वस्त्यांमध्ये पाणी मिळत नाही. तरीही रहिवाशी आठवडय़ातून एकदा स्वखर्चाने पाणी मिळवून शौचालयांची स्वच्छता करतात. परंतु पुरेसे पाणी मिळतच नाही. देखभालीसाठी कुणीच नसल्याने शौचालयांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर, घुशींचा सुळसुळाट वाढत आहे. तुटलेले दरवाजे, कडीचा पत्ता नसल्यामुळे महिलांची प्रचंड कुचंबणा होते. या अस्वच्छ शौचालयांमुळे रहिवाशांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  – अरविंद वानखेडे, समाजसेवक, क्रांतिनगर, कांदिवली