रसायनशास्त्रातील एका प्रश्नामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

नीटसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे वैद्यकीय प्रवेशांबाबत उद्भवलेल्या संभ्रमाच्या वातावरणात गुरूवारी महाराष्ट्राची एमएचटी-सीईटी ही राज्यस्तरीय सामाईक प्रवेश परीक्षा पार पडली. राज्यातील १०५६ परीक्षा केंद्रांवर एकूण ४,०९,२६० इतके विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.

रसायनशास्त्रीतील ‘ िब्लॉक’वर आधारलेल्या ‘विच इज कलरलेस आयर्न?’ या प्रश्नाबाबत विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. हा प्रश्न सोडविण्याकरिता आवश्यक ते ‘चार्जेस’ देणे आवश्यक होते. परंतु, दिले नसल्याने विद्यार्थ्यांना रंग ओळखता आला नाही, असे एस.पी. क्लासेसचे सुभाष जोशी यांनी सांगितले. ‘एमएचटी-सीईटीच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दिल्या जात नाहीत. परंतु, अनेक विद्यार्थी जितके प्रश्न आठवतात त्या विषयी आपल्याकडे येऊन चर्चा करतात. ५मेची सीईटी झाल्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रश्नातील वरील चूक लक्षात आणून दिली,’ असे जोशी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान जीवशास्त्राची परीक्षा आधी घेण्यात आल्याने गणिताच्या विद्यार्थ्यांना दीड ते दोन तास परीक्षा केंद्राच्या बाहेर उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. जीवशास्त्राचा किंवा गणिताचा पेपर सर्वात आधी घ्यावा आणि त्यानंतर रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या दोन विषयांची एकत्रित परीक्षा घेण्यात यावी, अशी सूचना दरवर्षी पालकांकडून घेतली जाते. कारण, सर्वच विद्यार्थी चारही विषयांच्या परीक्षा देत नाहीत. परंतु, याही वर्षी ही सूचना धुडकावून लावण्यात आल्याने हजारो विद्यार्थ्यांना जीवशास्त्राची परीक्षा होईपर्यंत परीक्षा केंद्राच्या बाहेर भर उन्हात थांबावे लागले.